आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस: नोवाक योकोविक, सेरेना विल्‍यम्‍सची अागेकूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - जागतिक टेनिस क्रमवारीतील पुरुष आणि महिला गटाचे अव्वल खेळाडू अनुक्रमे सर्बियाचा नोवाक योकोविक आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी सलामी दिली. योकोविकने द. कोरियाच्या चुंग हियोनला ६-३, ६-२, ६-४ ने मात दिली, तर अमेरिकेच्या सेरेनाने इटलीच्या कॅमिली जियोर्जीला ६-४, ७-५ ने हरवले.
दुखापतीमुळे मागच्या चार महिन्यांत पहिला सामना खेळणाऱ्या सेरेनाला कॅमिलीकडून जोरदार आव्हान मिळाले. सेरेना पहिल्या सेटमध्ये ४-१ ने मागे पडली होती. नंतर तिने पुनरागमन करताना बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्येसुद्धा कॅमिलीने ५-५ अशी बरोबरी केली होती. मात्र, सेरेनाने अनुभवाच्या बळावर बाजी मारली. तिने दुसरा सेट टायब्रेकरवर जिंकला.
पुरुष गटात गतचॅम्पियन आणि अव्वल मानांकित योकोविकने मेलबर्न पार्कवर ३५ डिग्री सेल्सियस इतक्या गरमीत एकूण ४० विनर्स मारले. चुंगला केवळ १५ विनर्स मारता आले. पुरुष एकेरीतील इतर एका लढतीत १४ वा मानांकित फ्रान्सच्या जाईल्स सिमोनने कॅनडाच्या वासेक पोसपिसिलला ६-७, ६-३, ६-२, ६-४ ने, तर १२ वा मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिचने हॉलंडच्या थिएमो डी बाकेरला ६-७, ७-५, ६-२, ६-४ ने मात दिली.
रदवांस्का, क्वितोवा पुढच्या फेरीत
महिला गटातील पहिल्या फेरीत चौथी मानांकित पोलंडची एग्निजस्का रदवांस्काने अमेरिकेच्या क्रिस्टिना मॅकहेलला ६-२, ६-३ ने सरळ सेटमध्ये, तर सहावी मानांकित चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोवाने थायलंडच्या लुकसिका कुमकुमला ६-३, ६-१ ने मात दिली. स्वित्झर्लंडची युवा खेळाडू १२ वी मानांकित बेलिंडा बेनसिसने अमेरिकेच्या एलिसन रिस्केला ६-४, ६-३ ने, तर १३ वी मानांकित इटलीच्या रॉबर्टा विन्सीने ऑस्ट्रियाच्या तामिरा पास्जेकला ६-४, ६-२ ने सहजपणे दोन सेटमध्ये हरवले.
रॉजर फेडरर दुसऱ्या फेरीत दाखल
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विजयासह सुरुवात केली. त्याने जॉॅर्जियाच्या िनकोलोज बेसिलाशविलीला ६-२, ६-१, ६-२ ने पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. फेडररने ३१ विनर्स मारताना ११७ वा मानांकित निकोलोजला पराभूत केले.

युकी भांबरीचा पराभव
भारताचा युवा खेळाडू युकी भांबरीचा पहिल्याच फेरीत जगातला सहाव्या क्रमांकाचा थॉमस बर्डिचकडून पराभव झाला. बर्डिचने ७-५, ६-१, ६-२ ने विजय मिळवला. बर्डिचने ३५ विनर्स आणि १३ ऐस मारले.
सामना हरण्यासाठी १ कोटीची ऑफर
जगातला नंबर वन टेनिसपटू नोवाक योकोविकला २००७ मध्ये एक सामना गमावण्यासाठी १ कोटी रुपयांची (१.१० लाख पाउंड) ऑफर मिळाली होती. त्याने हा प्रस्ताव फेटाळला होता. योकोविकच्या या दाव्यामुळे टेनिसमध्ये फिक्सिंग सामील असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. योकोविकने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपला पहिला सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत हा दावा केला. योकोविक म्हणाला, "सेंट पीटर्सबर्ग येथे मला एकाने सामना फिक्स करण्यासाठी संपर्क साधला होता. जे माझ्यासोबत काम करीत होते, त्यांच्याद्वारे मला संपर्क साधण्यात आले. मी प्रस्ताव नाकारला. एका व्यक्तीला माझ्याशी बोलायचे होते, तो सुद्धा थेट बोलत नव्हता. माझ्यासाठी हे सर्व खेळ भावनेच्या विरुद्ध होते. हा गुन्हा होता. यानंतर पुढचे सहा, सात वर्षे मी याबाबत काही ऐकले नाही. मला थेट कोणीही संपर्क साधला नाही.'

१६ खेळाडू सामील ?
बीबीसी आणि फजबिड यांनी दिलेल्या एका वृत्तानुसार मॅचफिक्सिंग प्रकरणात मागच्या एक दशकात टॉप ५० पैकी १६ खेळाडू सामील आहेत. यात माजी ग्रँडस्लॅम चॅम्पियनही सामील आहेत. ही माहिती असताना एटीपीने या खेळाडूंना खेळू दिले, असा आरोप या वृत्तात करण्यात आला आहे.