न्यूयॉर्क - जागतिक क्रमवारीतील नंबर वन सेरेना विल्यम्सने आपली मोठी बहीण व्हीनसचा पराभव करून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेरेनाने क्वार्टर फायनलमध्ये व्हीनसला ६-२, १-६, ६-३ ने पराभूत करून ग्रँडस्लॅमकडे आगेकूच केली. सेरेनाने या वर्षी तीन ग्रँडस्लॅम जिंकले असून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यासाठी तिचे प्रयत्न आहेत. दुसरीकडे पुरुष गटात नंबर वन सर्बियाच्या नोवाक योकोविकने नवव्यांदा अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे.
फ्लडलाइटमध्ये झालेल्या सेरेना-व्हीनस सामन्यात सेरेनाने व्हीनसविरुद्ध विजयी सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये पाचवा आणि सातव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करून १-० ने आघाडी घेतली. व्हीनसने दुसर्या सेटमध्ये सेरेनाच्या ग्राउंड स्ट्रोक्सवर झालेल्या चुकांचा फायदा उचलताना ६-१ ने विजय मिळवला. या सेटनंतर सामना १-१ असा बरोबरीत होता. सेरेनाने चुका टाळून तिसर्या सेटसह सामना जिंकला.
योकोविकची लोपेजवर मात
पुरुष गटातील क्वार्टर फायनलमध्ये योकोविकने १८ वा मानांकित एफ. लोपेजला हरवले. हा सामना जिंकण्यासाठी योकोविकला घाम गाळावा लागला. दुसरा सेट ३-६ ने गमावल्यानंतर चौथ्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये त्याने ७-२ ने विजय िमळवला. लोपेजने ४१ पैकी २८ सर्व्हचे गुण मिळवले. लोपेजने १४ ऐसही मारले. प्रत्युत्तरात योकोविकने १९ गुण मिळवताना ९ ऐस मारले. आता सेमीफायनलमध्ये योकोविकचा सामना गतविजेता मारिन सिलिचसोबत होईल. सिलिचने फ्रान्सच्या जो. विल्फ्रेड सोंगाला ६-४, ६-४, ३-६, ६-७ (३-७), ६-४ ने हरवले.
व्हीनसने टक्कर दिली
व्हीनसने मला जोरदार टक्कर दिली. ती माझ्या जीवनातील सर्वाधिक आव्हानात्मक खेळाडू आहे. आपली सर्वात चांगली मैत्रीण आणि टेनिस कोर्टवर तिची विरोधी असताना खेळणे सोपे नसते. हा सामना माझ्यासाठी कठीण होता. - सेरेना विल्यम्स, विजयानंतर प्रतिक्रिया.
सानिया मिर्झा-मार्टिना हिंगीस सेमीफायनलमध्ये दाखल
वर्ल्ड नंबर वन महिला दुहेरीची खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सानिया-हिंगीसने क्वार्टर फायनलमध्ये नववी मानांकित चीन-तैपेईची जोडी यंग जान चान आणि हाओ चिंग चान यांना ७-६, ६-१ ने हरवले. विम्बल्डन महिला दुहेरीची चॅम्पियन जोडी सानिया-हिंगीसने सामना ८५ मिनिटांत जिंकला. सानिया-हिंगीसने २५ विनर्स मारताना एकूण ७० गुण मिळवले. त्यांनी पहिल्या सर्व्हवर ६७ टक्के गुण मिळवले. अव्वल मानांकित या जोडीने चारपैकी चार ब्रेक पॉइंट मिळवले.