आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्‍या हर्षदाची आशियाई नेमबाजी स्पर्धेसाठी निवड, नवी दिल्ली येथे हाेणार स्‍पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील स्टार युवा नेमबाज हर्षदा सदानंद निठवेची नवी दिल्ली येथे होणाऱ्या ८ व्या आशियाई एअरगन आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि कुवेत येथे होणाऱ्या १३ व्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ती एअर पिस्तूल प्रकारात मुलींच्या युवा गटात देशाचे प्रतिनिधित्व करेल. विशेष म्हणजे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा सलग दोन स्पर्धांत खेळण्याची संधी मिळाली आहे.

या स्पर्धेसाठी निवड झालेली ती मराठवाड्यातील तेजस्विनी मुळेनंतरची दुसरी खेळाडू ठरली आहे. केरळमध्ये फेब्रुवारीत झालेल्या भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेत केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि कुमार सुरेंद्रसिंग स्मृती राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत मिळवलेल्या दोन सुवर्णपदकांच्या बळावर तिने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.
ती गेल्या चार वर्षांपासून एमजीएम नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची खेळाडू असून प्रशिक्षक प्रा. संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज ४ तास सराव करते. तिच्या यशाबद्दल एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, आशिष गाडेकर, डॉ. अपर्णा कक्कड, कर्नल प्रदीपकुमार, क्रीडा विभागप्रमुख प्रा. श्याम तळेगावकर यांनी अभिनंदन केले.
दिग्गजांकडून शिकण्याचा प्रयत्न
या स्पर्धेत माझ्यासोबत देशातील दिग्गज आणि अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्रा, गगन नारंग, जितू राय, हिना सिद्धू असून ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या खेळाडूंकडून त्यांची खेळण्याची पद्धत, तांत्रिक बाजू आदी शिकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत असले, तरी दडपण न घेता पदक मिळवण्याचा प्रयत्न करेन.
हर्षदा निठवे, नेमबाज

पदकाची अाशा
हर्षदाची तयारी चांगली झालेली असल्याने या स्पर्धेत तिच्याकडून पदकाची आशा आहे. वैयक्तिक आणि सांघिक गटात तिचा फाॅर्म चांगला आहे. निवड चाचणी स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
प्रा. संग्राम देशमुख, हर्षदाचे प्रशिक्षक