आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन : मलेशियात पी. व्ही. सिंधू ठरली दुसऱ्यांदा चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेनांग - भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शानदार फॉर्म राखताना स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमरला सरळ गेममध्ये पराभूत करून मलेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिंधूने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. नव्या बॅडमिंटन सत्रातील सिंधूचे हे पहिले विजेतेपद ठरले आहे. सिंधूने फायनलमध्ये गिलमरला २१-१५, २१-१९ ने पराभूत केले.

सामन्याचा निकाल ३२ मिनिटांत लागला. सिंधूचा हा एकूण पाचवा ग्रांप्री गोल्ड किताब ठरला आहे. यापूर्वी सिंधू आणि गिलमरचा सामना २०१३ मध्ये फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत झाला होता. त्या वेळी सिंधूचा पराभव झाला होता. त्या पराभवाचा हिशेब सिंधूने रविवारी चुकता केला. सिंधूचे मलेशिया मास्टर्स ग्रां.प्री.चे दुसरे विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी तिने २०१३ मध्ये येथे किताब पटकावला होता. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने मकाऊ ओपन ग्रांप्री गोल्ड किताब जिंकून हॅट्िट्रक पूर्ण केली होती. या स्पर्धेपूर्वी प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) िसंधू अजेय ठरली होती.

सिंधूचा आक्रमक खेळ
फायनलमध्ये सिंधू आणि गिलमर यांच्या खेळातील अंतर पहिल्या गेमपासून दिसून येत होते. सिंधूने कोर्टला चांगले कव्हर केले. शिवाय तिने चुकाही टाळल्या. पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीलाच ५-२ ने आघाडी घेतली. यानंतर तिने शानदार रणनीतीने आघाडी कायम ठेवली. एकवेळ सिंधू १२-६ अशा मजबूत स्थितीत होती. नंतर हे चित्र १८-१० असे बदलले. दुसरीकडे गिलमरने सलग ४ गुण मिळवले. मात्र, संपूर्ण सामन्यात ती सिंधूला कधीही आव्हान देऊ शकली नाही. सिंधूने सहजपणे पहिला गेम आपल्या नावे केला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने ५-२ अशी आघाडी घेऊन चांगली सुरुवात केली. मात्र, गिलमरने लगेच बरोबरी केली. सिंधूने यानंतर शानदार खेळाचे प्रदर्शन केले आणि ९-५ अशी आघाडी घेतली. नंतर सिंधूने १६-५ असा स्कोअर केला. गिलमरने अखेरपर्यंत संघर्ष केला. मात्र, ती विजय मिळवू शकली नाही. सिंधूने सुरुवातीपासून अखेरपर्यंत सामन्यावर पकड ठेवली आणि बाजी मारली.

सिंधू स्पर्धेत सुरुवातीपासून विजेतेपदाची प्रबळ दावेदार होती. तिने क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्ये विजेत्या खेळाडूप्रमाणेच दमदार खेळ केला. फायलनच्या सामन्याला तिच्या दमदार प्रदर्शनाने एकतर्फी ठरवले.
पी.व्ही. सिंधूचे यश असे
२०११ : डच ओपनमध्ये रौप्यपदक
२०१२ : सय्यद मोदी ग्रांप्री रौप्यपदक
२०१३ : मलेशिया मास्टर्स ग्रांप्री सुवर्ण
२०१३ : मकाऊ ओपनमध्ये सुवर्ण
२०१३ : वर्ल्ड बॅडमिंटनमध्ये कांस्य
२०१४ : मकाऊ ओपनमध्ये सुवर्ण
२०१४ : वर्ल्ड बॅडमिंटनमध्ये कांस्य
२०१५ : मकाऊ ओपनमध्ये सुवर्ण
२०१५ : डेन्मार्क ओपनमध्ये रौप्यपदक
२०१६ : मलेशिया मास्टर्स ग्रांप्री सुवर्ण
शानदार सुरुवात
^हा खूप चांगला विजय आहे. माझ्यासाठी सत्राची शानदार सुरुवात आहे. मी चांगले खेळत आहे. फायनलच्या आधी विजयाचा विश्वास होता. खरे तर सेमीफायनलचा सामना कठीण होता. तो जिंकल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला.
- पी.व्ही.सिंधू, विजयानंतर.
- सिंधूचे हे कारकीर्दीतील पाचवे ग्रां.प्री. चे विजेतेपद ठरले. मलेशियाचे दोन आणि मकाऊचे ३ किताब तिच्या नावे आहे.