सोलापूर- मॅटवर खो-खो खेळण्यासाठी विशिष्ट प्रकारचे बूट आहेत. त्या बुटांसह मॅटवर खेळल्यास रेल्वेचा संघ आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवू शकतो. भारतीय खेळ महासंघ खेळाडूंना बूट घालून खेळणे अनिवार्य करत नाही तोवर हे शक्य होणार नाही, असे स्पष्ट मत रेल्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक सुधीर म्हस्के यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले.
आजपासून सोलापुरात राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे. रेल्वे संघाने रेल्वे मैदानावरील शिबिरात १५ दिवसांचा कसून सरावही पूर्ण केला आहे.
आम्हीच सुवर्णचे दावेदार : राष्ट्रीय खो-खो स्पर्धा गतसाली रेल्वेनेच जिंकली होती. सलग ६ वर्षे रेल्वेने या स्पर्धेवर अधिराज्य गाजवले. खेळाडूंचा फॉर्म पाहता यंदाही विजेतेपद मिळवू, असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला.
चार ‘एकलव्य’ विजेते संघात
रेल्वेचा संघ तगडा आहे. खो-खोत राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम पुरस्काराचा मान ज्या एकलव्य पुरस्काराच्या रूपाने दिला जातो तो पुरस्कारप्राप्त चार खेळाडू रेल्वेकडे आहेत. यावरून त्यांच्या बळाची कल्पना येईल. राहुल तामगावे, मनोज पवार, विलास करंडे व योगेश मोरे या एकलव्य विजेते अाहेत. हे सारे महाराष्ट्राचेच. राष्ट्रीय स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणारा प्रत्येक एक खेळाडू घेऊन महाराष्ट्राच्या संघाला खिंडार पाडणे ही यामागची रणनीती.
तेलंगणमुळे रेल्वेला ‘आनंद’
रेल्वे संघात आनंदकुमार हा परराज्यातील एकमेव खेळाडू आहे. आनंदकुमार तेलंगणचा. ६ वर्षांचा अनुभव त्याच्या गाठी आहे. या वर्षीही रेल्वेच्या विजयासाठी जिवाचे रान करू, असे त्याने सांगितले.
प्रशिक्षकही कळीचा
स्पर्धेसाठी खो-खो संघ निवडताना प्रशिक्षकाचे मत विचारात घेतले जाते. अंतिम संघ निवडण्याचा अधिकार प्रशिक्षकांनाच दिला जातो. कारण खेळाडूंच्या बारकाव्याची त्यांना माहिती असते. सरावात खेळाडूंचे मैदानावरील कौशल्य पाहून अंतिम संघनिवड होते.