आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस: सानिया मिर्झा- मार्टिना हिंगीस विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- जगातला नंबर दोनचा खेळाडू इंग्लंडच्या अँडी मरेने टेनिस इतिहासात सर्वात वेगवान सर्व्हिस करणारा ऑस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथविरुद्ध सहज विजय मिळवला आहे. पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये भारताची नंबर वन टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी महिला दुहेरीत विजयी सलामी दिली. सानिया-मार्टिना जोडीचा हा सलग ३१ वा िवजय ठरला. दुसरीकडे महिला गटात सर्बियाचा अॅना इवानोविक, बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका, स्पेनची गर्बाईन मुगुरुजा, स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी दुसऱ्या फेरीतील आपापले सामने जिंकले.

इंग्लंडचा खेळाडू मरेने दुसऱ्या फेरीत ग्रोथवर ६-०, ६-४, ६-१ ने विजय मिळवला. इंग्लंडच्या खेळाडूने हा सामना ९१ मिनिटांत जिंकला. ग्रोथच्या नावे सर्वात वेगवान सर्व्हिस करण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने २०१२ मध्ये २६३ किमी ताशी वेगाने सर्व्हिस केली होती. मात्र, रॉड लेवर एरिनावर ग्रोथ इंग्लंडच्या खेळाडूसमोर आव्हान सादर करू शकला नाही. मरेने शानदार डिफेन्स आणि जबरदस्त फटक्यांच्या बळावर ग्रोथवर वरचढ होऊ दिले नाही. तिसऱ्या फेरीत मरेचा सामना पोर्तुगालच्या जोओ सोसा याच्याशी होईल. सोसाने कोलंबियाच्या सेंटियागो गिराल्डो याला ६-३, ७-५, ३-६, ६-१ ने हरवले. आठवा मानांकित फेररने ऑस्ट्रेलियाच्या लियोटन हेविटला ६-२, ६-४, ६-४ ने मात दिली.
इवानोविक, अझारेंका विजयी : १४ वी मानांकित अझारेंकाने मोंटेनेग्रोच्या डांका कोविनिकला ६-१, ६-२ ने तर २० वी मानांकित इवानोविकने लात्वियाच्या अॅनास्तासिया सेवास्तोवाला ६-३, ६-३ ने पराभूत केले. तिसऱ्या फेरीत अझारेंकासमोर जपानची १८ वर्षीय क्वालिफायर खेळाडू नाओमी ओसाकाचे आव्हान असेल. पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळत असलेल्या ओसाकाने १८ वी मानांकित युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाला ६-४, ६-४ ने हरवले. तिसरी मानांकित मुगुरुजाने बेल्जियमच्या क्रिस्टिन फ्लिपकेन्सला ६-४, ६-२ ने तर सातवी मानांकित जर्मनीच्या अँजोलिक कर्बरने रोमानियाच्या अॅलेक्झांड्रा डलघेरूला ६-२, ६-४ ने मात दिली.
माजी नंबर वन आणि १९ वी मानांकित सर्बियाच्या जेलेना जांकोविकला दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या लॉरा सिजमडने ३-६, ७-६, ६-४ अशा फरकाने हरवले. हा सामना तीन सेटपर्यंत रंगला. यात लॉराने बाजी मारली.
२३ वर्षांनंतर झाला असा सामना
स्पेनचा फेलिसियानो लोपेज आणि अर्जेंटिनाचा गुड्डो पेला यांच्यात पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीचा सामना पाच सेटपर्यंत रंगला. १८ वा मानांकित लोपेजने हा सामना ७-६ (२), ६-७ (४), ७-६ (३), ६-७ (८), ६-४ ने जिंकला. २३ वर्षांत प्रथमच एखाद्या सामन्यांत पाच सेटपैकी चार सेट टायब्रेकरपर्यंत खेचले गेले.
सानिया-हिंगीसचा सलग ३१ वा विजय
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची तिची जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी महिला दुहेरीत विजयी सुरुवात केली. अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने कोलंबियाची मारियाना डक मारिनो आणि ब्राझीलची तेलियाना परेरा या बिगर मानांकित जोडीला ६-२, ६-३ ने हरवले. सानिया-हिंगीसचा जोडीने हा सलग ३१ वा विक्रमी विजय ठरला आहे. या दोघींनी एक तास १० मिनिटांत विजय मिळवला. दुसरीकडे पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरिन मेर्जिया यांनी ऑस्ट्रेलियाचा नीक किर्गियोस आणि ओमार जिसका यांना ७-५, ६-३ ने मात दिली.
बहिणींच्या दोन जोड्या जिंकल्या
महिला दुहेरीत पहिल्या फेरीत बहिणींच्या दोन जोड्या जिंकल्या. ऑस्ट्रेलियाची अनास्तिसिया-एरिना रोडियोनोवा यांनी स्पेनची लारा एरुआबारेना व स्लोवाकियाची आंद्रेजा क्लेपेक यांना ६-०, ६-४ ने पराभूत केले. इतर एका सामन्यात तैवानच्या बहिणी युंग जान चान आणि हाओ चिंग चान यांनी चेकची डेनिसा अलर्टोवा व हॉलंडची डेमी शुर्स यांना ६-१, ६-१ ने पराभूत केले.