आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त टेनिसच नव्हे तर चित्रपटांतही सेरेनाचा जलवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपण जाणून घेऊया टेनिस स्टार सेरेना विल्यम्सविषयी. ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवामुळे ती चर्चेत आहे. हा किताब तिने ६ वेळा जिंकला आहे. करिअरमध्ये ३६ ग्रँडस्लॅम जिंकणारी सेरेना टीव्ही व चित्रपटांतही सक्रिय आहे. १० अब्जांच्या संपत्तीची मालकीण सेरेना फॅशन आयकॉनही आहे.

३४ वर्षीय सेरेना विल्यम्स ही अमेरिकेची टेनिसपटू मैदानाबाहेरही चर्चेत असते. जगातील अव्वल क्रमांकाची टेनिसपटू सेरेनाने करिअरमध्ये ३६ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यापैकी २१ एकेरी, १३ दुहेरी आणि २ मिश्र दुहेरीचे आहेत. तिचे यश फक्त टेनिसपुरतेच मर्यादित नाही तर ती चित्रपट आणि छोट्या पडद्यावरही बरीच सक्रिय आहे. तिचा फॅशन सेन्सही तितकाच दर्जेदार आहे. प्रत्येक स्पर्धेत ती पोशाख आणि आपल्या लूकवर बरेच प्रयोग करते.
२६ सप्टेंबर १९८१ रोजी मिशिगनमध्ये रिचर्ड आणि ओरकेन विल्यम्स यांच्या घरी तिचा जन्म झाला. तेव्हाच तिचे कुटुंबीय कॉम्पटनमध्ये (कॅलिफोर्निया) स्थलांतरित झाले. वयाच्या चौथ्या वर्षीपासून तिने टेनिस खेळणे सुरू केले. नवव्या वर्षी सेरेना कुटुंबीयांसह फ्लोरिडामध्ये राहायला गेली. तेव्हापासून अद्याप तिचे टेनिसवर वर्चस्व कायम आहे. मैदानाबाहेर फॅशन आणि अभिनय हे तिचे छंद आहेत. अनेक अॅनिमेटेड शोजमध्ये तिने आपला आवाज दिला असून सुमारे २२ चित्रपट आणि मालिकांमध्येही तिने काम केले आहे. एप्रिल २०१५ मध्ये प्रकाशित वोग नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारी सेरेना पहिलीच कृष्णवर्णीय महिला खेळाडू आहे. २००४ मध्ये तिने " एनेरेस' नावाने स्वत:चा कपड्यांचा ब्रँड आणला, तर २००९ मध्ये हँडबॅग आणि आभूषणांचे सिग्नेचर कलेक्शनही सुरू केले. ती न्यूयॉर्क फॅशन वीकमध्येही झळकली आहे. नखांप्रति आपली आवड दाखवण्यासाठी तिने टेनिस व फॅशनच्या दुनियेत ग्लेम स्लेम सिरीजही सुरू केली. ती प्रमाणित "नेल (नख) टेक्निशियन' असून स्पोर्ट््स इलस्ट्रेटेड नियतकालिकाच्या स्विमशूट अंकासाठी दोन वेळा पोझही दिली आहे. एका मालिकेसाठी कथालेखनही सेरेनाने केले असून "ऑन द लाइन' नावाने आत्मचरित्रही लिहिले आहे.
सेरेना सामाजिक उपक्रमांतही नेहमीच अग्रेसर असते. शिक्षण क्षेत्रापासून जातीय दंगलीतील पीडितांच्या मदतीसाठी ती नेहमी मदत करत असते. युनिसेफने ितला आपले जागतिक अॅम्बेसेडर बनवले असून याच माध्यमातून तिने केनियात एक शाळाही सुरू केली आहे. तिच्या संस्थेच्या माध्यमातून चॅरिटी टेनिस सामन्यांचे आयोजन केले जाते आणि त्यातून गरजूंसाठी निधी गोळा केला जातो. सेरेनाकडे भुरकट रंगाचा याॅर्कशायर टॅरिअर प्रजातीचा कुत्राही असून त्याचे नाव 'चिप' ठेवले आहे. सरावावेळी चिप नेहमीच तिच्यासोबत असतो. फेसबुकवर ती नेहमीच चिपसोबतचे छायाचित्र टाकत असते. रशियाची टेनिस खेळाडू मारिया शारापोवानंतर सर्वाधिक कमाई करणारी ती दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू आहे. तिची वार्षिक कमाई १ अब्ज ६६ कोटींच्या घरात आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल सेरेना
पुरस्कार - ३६ ग्रँडस्लॅम, ४ ऑलिम्पिक सुवर्ण
कमाई - २४.६ दशलक्ष डॉलर (सुमारे १ अब्ज ६६ कोटी रुपये)
संपत्ती - १४५ दशलक्ष डॉलर (सुमारे ९ अब्ज ७९ कोटी रुपये)
प्रमुख प्रायोजक- नायकी, डेल्टा, आयबीएम, चेसबँकसह १५ ब्रँड