आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे सेलिब्रिटी मेसी: उपचाराच्या पैशासाठी मेसीने देश सोडला होता ..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपल्या भेटीला बार्सिलोनाकडून खेळणारा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत पनामाविरुद्ध गोलची हॅट्ट्रिक करून तो चर्चेत आला. फोर्ब्जने नुकत्याच प्रकाशित केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने दुसरे स्थान पटकावले होते.

आपणाला मेसीची व्याख्या करायची असेल तर ती एक असा खेळाडू, जो मैदानावर चपळ, चतुर, वेगवान, तरबेज आणि ज्याला कोणीही रोखू शकत नाही अशी असेल. फुटबॉलमध्ये अनेक विक्रम करणारा मेसी आपल्या खेळाशिवाय चॅरिटीसाठी सुप्रसिद्ध आहे. २८ वर्षीय ५ फूट ७ इंच उंच असलेल्या मेसीने वयाच्या ६ व्या वर्षापासून फुटबॉलला सुरुवात केली होती. तो रोसारियाचा क्लब "नेवेल्स ओल्ड बॉइज'शी सलंग्न झाला होता. त्याने आपल्या क्लबकडून जवळपास ५०० गोल केले होते. तो १० वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबाला त्याच्या ग्रोथ हार्मोन डिफिशियन्शीबाबत माहिती झाली. या आजारात माणसाची उंची वाढणे बंद होते. त्याचे कुटुंब आणि क्लबने त्याच्या उपचारासाठी दोन वर्षांचा खर्च उचलला. त्याने फुटबॉल कायम ठेवले. मात्र, दोन वर्षांनी क्लबने खर्चास नकार दिला. दरम्यान त्याने स्पॅनिश क्लब बार्सिलोनासाठी ट्रायल दिली होती. क्लबच्या कोचने त्याची प्रतिभा ओळखली. क्लब मेसीचा खर्च उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. क्लबचे संचालक कार्ल्स रेक्साच यांनी त्याला करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्या वेळी रेक्साच यांच्याकडे अधिकृत बाँडपेपर किंवा स्टँपपेपर नव्हते. त्यांनी पेपर नॅपकिनवर करार तयार करून दिले.त्यावर स्वाक्षरी करून मेसी क्लबमध्ये सामील झाला. आपल्या उपचारावर खर्च उचलण्यास तयार असलेल्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी मेसी अशा प्रकारे अर्जेंटिना सोडून स्पेनमध्ये आला. येथूनच त्याच्या फुटबॉल करिअरला सुरुवात झाली. यानंतर त्याने कधीही मागे वळून बघितले नाही. त्याला स्पेनच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचीही ऑफर मिळाली. मात्र, त्याने ती ऑफर नाकारली. मी स्पेनमध्ये वास्तव्यास असलो तरीही माझी पाळेमुळे अर्जेंटिनातच आहेत. यामुळे मी अर्जेंटिनाकडूनच खेळणार, असे मेसीने म्हटले.
मेसीची खेळण्याची शैली महान खेळाडू दिएगो मॅराडोनाशी मिळतीजुळती आहे. यामुळे चाहत्यांनी त्याला "मेसिडोना' म्हणण्यास सुरुवात केली. मॅरेडोना २०१० मध्ये अर्जेंटिनाचे काेच होते. त्या वेळी त्यांनी मेसीची स्तुती करताना "मेसी माझा मॅरेडोना आहे,' असे म्हटले होते. मेसीचे आपले कुटुंब आणि देशावर खूप प्रेम आहे. मेसीने २००७ मध्ये "लियो मेसी फाउंडेशन' बनवले. त्याची संस्था दुबळी मुले, असुरक्षित बालकांचे शिक्षण, आरोग्यासाठी मदत करते.युनिसेफचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून त्याची निवड झाली आहे. रोसारियोत एका रुग्णालयाला त्याने साडेचार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम दान केली आहे. मेसी अदिदास, पेप्सी, ईए स्पोर्ट््स, सॅमसंग, टाटा मोटर्स, वॉकर्ससह अनेक मोठ्या ब्रँड््सला एंडोर्स करतो.
बातम्या आणखी आहेत...