आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४५ दिवस दरराेज १५ तासांत ७७ किमी धावला, अल्ट्रामॅरेथाॅनमध्ये नाेंदवला विश्वविक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलांटा - अमेरिकेचा अल्टरामॅरेथाॅनर कार्ल मेल्टजर हा सलग ४५ दिवस धावत राहिला. त्याने दिवसाकाठी १५ तास ७७ किमीचे अंतर गाठले. ताे ६००० फूट उंचीच्या पर्वतावर धावला. दरम्यान, त्याने नदी अाणि अनेक पूलही पार केलेे. दिवस-रात्र ताे धावतच राहिला. उन्हातान्हातही त्याने अापला हा छंद अविरतपणे जाेपासला. डाेंगरावर त्याने ५ लाख फूट क्लाइंबिंगदेखील केली. गत रविवारी सकाळी ३.३८ वाजता जाॅर्जियाच्या स्प्रिंगर माउंटेनवर थांबल्यानंतर त्याने ३५२४ किमीची अल्ट्रामॅरेथाॅन अपालाचियन ट्रायल पूर्ण केली. तीदेखील नव्या विश्वविक्रमासह. त्याने ही रेस ४५ दिवस २२ तास ३८ मिनिटांमध्ये पूर्ण केली. यादरम्यान त्याने अापला सहकारी अाणि ट्रेनिंग पार्टनर स्काॅट ज्युरेकचा (४६ दिवस, ८ तास ७ मिनिटे) विक्रम माेडीत काढला. या रेसदरम्यान कार्लने ३४५१२२ कॅलरी बर्न केली. अमेरिकेच्या १२ राज्यांचा परिसर त्याने पालथा घातला. यासाठी त्याला २० बुटांचे जाेड लागले. म्हणजेच त्याला दर दाेन दिवसांसाठी एक बुटाचा जाेड वापरावा लागला. त्याने एकूण ६७८ तास दाैड लावली. अपालाचियन ट्रायल रेसमध्ये ११ हजार धावपटूंनी सहभाग नाेंदवला हाेता. मात्र, यामध्ये कार्ल हा सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने तिसऱ्यांदा या स्पर्धेत सहभाग घेऊन फिनिश लाइन पार केली. ‘हा विश्वविक्रम नाेंदवण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. यासाठी मी दरराेज पहाटे ४ वाजता उठून ५० मैलांपर्यंत धावत हाेताे. सुरुवातीला मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, काही दिवसांमध्ये मी या अडचणींवर मात केली. त्याचेच फळ मला मिळाले,’ अशी प्रतिक्रिया कार्लने दिली.

सर्वात कठीण हार्डराॅक रेस जिंकणारा एकमेव धावपटू
‘स्पीडगाेट कार्ल’ नावाने प्रसिद्ध कार्लने अापल्या करिअरमध्ये ८९ अल्ट्रामॅरेथाॅनमध्ये सहभाग घेतला. त्याने ३८ पेक्षा अधिक १०० मैलांच्या रेस अापल्या नावे केल्या अाहेत. याशिवाय कार्ल हा सर्वात कठीण हार्डराॅक १०० मैल इंड्युरन्स रेस पाच वेळा जिंकणारा एकमेव रनर अाहे.
बातम्या आणखी आहेत...