आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर वडिलांची स्वप्नपूर्ती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - करिअर आणि काैटुंबिक जबाबदारीमुळे उराशी बाळगलेली काही स्वप्ने तशीच अर्धवट राहतात. त्याची खंत आयुष्यभर मनाला लागलेली असते. मात्र, वडिलांच्या याच स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पाल्याने घेतलेली मेहनत अधिकच प्रेरणादायी ठरते. याचाच प्रत्यय आैरंगाबादची युवा धावपटू राशी जखाटेने आणून दिला. प्रचंड मेहनतीच्या बळावर तिने अवघ्या तीन वर्षांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची वडिलांची स्वप्नपूर्ती केली. आैरंगाबादची ही राष्ट्रीय धावपटू चीनमधील वुहानच्या ट्रॅकवर धावणार आहे. येत्या शनिवारपासून चीनमध्ये जागतिक शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला सुरुवात हाेईल. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राशी जखाटे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत राशीसह महाराष्ट्राच्या चार युवा धावपटूंचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी वुहानला रवाना झाला.

अल्पावधीत साकारले स्वप्न
आयुष्यात एकदा तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करावे, असे हरीश जखाटे यांचे स्वप्न हाेते, परंतु त्यांना हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. मात्र, वडिलांच्या या स्वप्नांना राशीने तीन वर्षांत साकार केले. कसून सराव व सातत्याने कामगिरीचा दर्जा उंचावत तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. या स्पर्धेत राशी ही १०० मीटर आणि ४ बाय १०० रिलेमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करेल. ‘अल्पवधीतील हे यश खर्‍या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. भविष्यात तिच्याकडून माेठ्या कामगिरीची आशा आहे, अशी प्रतिक्रिया हरीश जखाटे यांनी दिली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी दाेन वेळा सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही मिळवलेला आहे.

तीन वर्षांत महाराष्ट्राला ३ पदके
युवा धावपटू राशीने अवघ्या तीन वर्षांत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके मिळवून दिली. यामध्ये एका सुवर्णासह दाेन राैप्यपदकांचा समावेश आहे. तिने राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना हे साेनेेरी यश संपादन केले.
बातम्या आणखी आहेत...