आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे सेलिब्रिटी मो. फराह: बनायचे होते कार मेकॅनिक; आता यशस्वी धावपटू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपल्या भेटीला येत आहे इंग्लंडचा धावपटू मोहंमद फराह. रशियन हॅकर्सनुसार त्याने बंदी असलेल्या आैषधीचे सेवन केले आहे. माझ्या वैद्यकीय अहवालात लपवण्यासारखे काहीच नाही, असे प्रत्युत्तरात फराहने म्हटले. सध्या तो यामुळे चर्चेत आहे.
इंग्लंडचा सर्वाधिक यशस्वी धावपटू मो. फराह. लांब पल्ल्याचा विश्वविक्रमी धावपटू. शिवाय कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरचा मानकरी. बालपणी तो कार मेकॅनिक बनण्याचे स्वप्न बघायचा. त्याला फुटबॉलही खूप आवडायचे. आर्सेनल क्लबकडून राइट विंगर म्हणून खेळण्याची त्याची योजना होती. मात्र, त्याच्या नशिबात तर ऑलिम्पिकची पदके लिहिली होती.
सोमालियाची राजधानी मोगादिशूत २३ मार्च १९८३ रोजी जन्मलेल्या फराहचे बालपण संघर्षमय होते. आठ सदस्य असलेले त्याचे कुटुंब एका खोलीत राहत असे. त्याच्याकडे खेळणेसुद्धा नव्हते. तो समुद्रकिनारी आणि चिखलात खेळायचा. आठ वर्षांचा असताना फराह आपले दोन भाऊ आणि आईसह लंडनला वडिलांकडे आला. त्याचा जुळा भाऊ हसन आजारी असल्याने सोबत येऊ शकला नाही. तो सोमालियात एका कुटंुबासोबत थांबला. त्याचे वडील दहा वर्षांनी हसनला घेण्यासाठी सोमालियात गेले तेव्हा हसनला ठेवणारे कुटुंब दुसरीकडे स्थलांतरित झाले होते. त्यांनी खूप शोध घेतला. दोन वर्षांनी हसनला शोधून त्यांनी त्याला लंडनला आणले.
दरम्यान, वयाच्या १३ व्या वर्षापासून फराहने शाळेतील मैदानी स्पर्धांत सहभागी होण्यास सुरुवात केली. २००५ मध्ये एका स्पर्धेच्या वेळी त्याची भेट ऑस्ट्रेलिया आणि जमैकाच्या जगप्रसिद्ध धावपटूंशी झाली. त्या भेटीने फराहच्या जीवनावर खूप परिणाम झाला. यानंतर फराहने अॅथलेटिक्समध्ये करिअर करण्याचे ठरवले आणि प्रोफेशनल ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली.
इस्लामला मानणारा फराह प्रत्येक स्पर्धेपूर्वी प्रार्थना करतो. तो म्हणतो, ‘कुराणमध्ये लिहिले आहे की, जे काही करायचे ते पूर्ण मेहनतीने करा. यामुळे मी खूप कठीण ट्रेनिंग घेतो. मी यामुळेच यशस्वी ठरतो. हाच माझ्या यशाचा मंत्र आहे.’ निवृत्तीनंतर फराहला आर्सेनल क्लबचा फिटनेस कोच बनण्याची इच्छा आहे. त्याने एप्रिल २०१० मध्ये मैत्रीण तानिया नेलशी लग्न केले. त्यांना दोन जुळ्या मुली आयशा आणि अमानी असून, एक मुलगा हुसेन आहे.
३३ कोटी रुपये संपत्तीचा मालक फराह समाजसेवेतही मागे नाही. त्याने २०११ मध्ये आपल्या सोमालिया दौऱ्यानंतर फराह फाउंडेशन बनवले. त्याच वर्षी त्याने एका टी.व्ही.शोमध्ये सहभागी होऊन दीड कोटी रुपये बक्षीस रक्कम जिंकली. त्याने ही रक्कम फाउंडेशनला दिली. याशिवाय तो बऱ्याच सेलिब्रिटींसोबत गरीब मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी कॅम्पेन चालवतो. जाे जितकी कमाई करतो, त्यातील जवळपास अर्धे पैसे तो फाउंडेशनमध्ये देतो. तो नाईकीसह जवळपास १० ब्रँडला एंडोर्स करतो. ‘िट्वट अॅम्बिशन : माय अॉटोबायोग्राफी’ नावाने त्याने आत्मचरित्रही लिहिले आहे. मुलांसाठी त्याने “रेडी स्टेडी मो’ पुस्तक लिहिले आहे. अनेक वेळा त्याला विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांकडून रोखण्यात येते.
३३ कोटी रुपये आहे संपत्ती
विक्रम
>चार ऑलिम्पिक सुवर्ण
>वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ५ पदके जिंकली
>एकाच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २ पदके जिंकणारा पहिला ब्रिटिश खेळाडूचा मानकरी
पुरस्कार
>बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर
>कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर
>लंडनच्या सर्वांत प्रतिभावंत २५ लोकांत सामील
बातम्या आणखी आहेत...