म्हैसूर - येथील ६६ व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत उत्तराखंड आणि सेनादलापाठोपाठ तामिळनाडू आणि पंजाब या संघांनीही पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तामिळनाडूने गुजरात संघावर ८२-५० असा लीलया विजय मिळवला.
तामिळनाडूचा स्टार खेळाडू अरविंद अण्णादुराई आणि सिवा बालन यांच्या झंझावातामुळे त्यांनी पूर्वार्धातच ४५-२९ अशी मोठी आघाडी घेतली होती. या दोघांनी प्रत्येकी १५ गुणांची नोंद केली, तर प्रसन्ना वेंकटेश यांनी १४ गुण मिळवत संघाच्या यशात योगदान दिले.
मध्यंतरालाच मोठी आघाडी घेत लढतीवर निर्विवाद वर्चस्व राखल्याने तामिळनाडू संघाला आपल्या राखीव खेळाडूंना अाजमावण्याची संधीही मिळाली. गुजराततर्फे दिशांत शहा आणि विनय कौशिक यांनी थोडीफार चमक दाखवली. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत केरळ संघाने पंजाबविरुद्ध सुरुवातीला २३-१७ अशी सहा गुणांची आघाडी घेत अपेक्षा उंचावल्या होत्या. रोबिन एस. (२४) आणि उंचापुरा जिष्णू नायर (१६) यांनी ही करामत केली होती. पंजाब संघाचा स्टार खेळाडू टी. जे. शहाणे (२४) अशप्रीत भुल्लर (२०) आणि गगनदीप सिंघ (१७) यांच्या साथीने पंजाबचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. दरम्यान, पंजाबने या स्पर्धेतील सर्वाधिक गुणांची नोंद केली.
महिला गटात भारतीय रेल्वे आणि केरळने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय रेल्वे संघाने प. बंगाल संघाचे आव्हान ८०-४४ असे आरामात परतावून लावले, तर केरळ संघाने पंजाबविरुद्ध ५८-२४ असा विजय मिळवला. प. बंगाल संघाची कामगिरी अपयशी ठरली.