रांची- लॉनबॉलची राष्ट्रीय खेळाडू अन्वरी खातून रांचीत असते. नक्षलग्रस्त भागातील डाल्टनगंजच्या नावाटोली येथील
आपले घर सोडून ती राजधानीत आली. आपला खेळ अधिक चांगला करण्यासाठी आणि कॉमनवेल्थ गेम्स-२०१८ ची तयारी करण्यासाठी ती रांचीत आली. आपले कुटुंबीय लग्नाची घाई आणि जबरदस्ती करत असल्याचा आरोप तिने केला. मात्र, देशासाठी खेळण्याची तिची इच्छा आहे. "दैनिक भास्कर'शी बोलताना तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
लग्नाआधी देशासाठी काहीतरी करायचे आहे...
मी दहावी झाले तेव्हापासून माझे कुटुंंबीय माझे लग्न लावण्याची घाई करत आहेत. मी त्यांना समजावून, पटवून आतापर्यंत कसेबसे खेळत आले आहे. सोबत शिक्षणही घेत आहे. माझे लक्ष्य कॉमनवेल्थ गेम्स २०१८चे आहे. यासाठी मी तयारी करत आहे. याच काळात कुटुंबाने लग्नाची घाई केली तर मी रांचीला आले. लग्नासाठी तर संपूर्ण वय शिल्लक आहे. मात्र, देशासाठी खेळायचे हेच वय आहे, असे मी त्यांना सांगितले. मी मेहनत करू शकते. लग्न केले तर मी खेळू शकणार नाही. मी एमएस्सी झूलॉजी आणि एमबीए (रुरल डेव्हलपमेंट)चे शिक्षण माझ्या स्कॉलरशिपवर पूर्ण केले आहे. दोन्हींत प्रथम श्रेणी मिळाली. सोबतच मी ग्रामीण विकास विभागाच्या मृदा संरक्षण विभाग, बुंडू येथे करारावर नोकरी करत आहे. मी केरळ येथे झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अंडर-२५ मध्ये राष्ट्रीय पातळीवर मी सुवर्ण जिंकले आहे. मी नामकूमच्या लॉन बॉल स्टेडियमवर सराव करते. कुटुंबातून लग्नासाठी कोणी गोंधळ घालू नये, याची भीती मला नेहमी असते. यामुळे मी डाल्टनगंजच्या पोलिसांना ही सर्व माहिती १२ जून रोजीच दिली आहे. आता मी रांचीच्या एसपीला भेटून हे सर्व सांगणार आहे. आई-वडिलांची नाराजी घेऊन कोणीच राहू शकत नाही, हे खरे आहे. मात्र, त्यांनीसुद्धा थोडा विचार करायला हवा. आपल्या समाजात आजही मुली मुक्तपणे जगू शकत नाहीत. मला माझे लक्ष्य गाठण्यासाठी मदत करा, अशी मी कुटुंबीयांना पुन्हा एकदा विनंती करते.
ही मुलगी रांचीत सराव करते. चांगली खेळाडू आहे. कमी दिवसांत प्रगती केली आहे. कुटुंबाच्या प्रकरणात मी बोलू शकत नाही. मात्र, खेळात तिला जी मदत लागेल, ती करायला मी तयार आहे. मधुकांतपाठक, भारतीयलॉन बॉल कोच.