आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी शर्टवर राष्ट्रपतींचे छायाचित्र; तुर्कीत तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल - सामन्यादरम्यान बऱ्याचदा खेळाडू आपला टी शर्ट काढून जल्लोष करतात. मात्र, यामुळे वातावरण गंभीर व्हावे अाणि तेसुद्धा एखाद्या राजकीय कारणाने, असे कमीच बघायला मिळते. फुटबॉलच्या युरोपा लीगच्या राउंड ऑफ ३२ च्या फर्स्ट लेग सामन्यात रशियन खेळाडूला राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचा फोटो असलेला टी शर्ट दाखवणे महागात पडू शकते.
हा सामना मंगळवारी इस्तंबूल येथे झाला. यात लोकोमोटिव्ह मॉस्को आणि फेनेरबॅक संघ समोरासमोर होते. यात तुर्कीच्या टीमकडून २-० अशा पराभवानंतर मॉस्कोचा मिडफील्डर दिमित्री तारासोवने राष्ट्रपतींचा फोटो असलेला टी-शर्ट दाखवला. यावर लिहिले होते की, 'द मोस्ट पोलाइट प्रेसिडेंट’ (सर्वाधिक नम्र राष्ट्रपती). यानंतर इस्तंबूलच्या सुकुरू स्टेडियममध्ये वातावरण बिघडले. तुर्कीच्या प्रेक्षकांनी मैदानावर दगडफेक सुरू केली. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना आपल्या ताब्यात घेतले.
नोव्हेंबरमध्ये तुर्कीने तुर्की-सिरिया बॉर्डरवर रशियाचे लढाऊ विमान पाडले तेव्हापासून दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत. दुसरीकडे युफाच्या कोणत्याही सामन्यादरम्यान राजकीय घोषणाबाजी वैध नाही. यामुळे हे प्रकरण अधिक तापले आहे. टी शर्ट घालणाऱ्या त्या फुटबॉलपटूने स्वत:चा बचाव केला असून पुतीन आमचे राष्ट्रपती आहेत आणि त्यांचे समर्थन करण्याचा मला पूर्ण हक्क आहे, असे त्याने म्हटले.

दोन्ही देशांतील तणाव बघता युफाने या स्पर्धेच्या सोडतीमध्ये आणि चॅम्पियन्स लीगमध्येसुद्धा दोन्ही देशांच्या (रशिया अाणि तुर्की) संघांना वेगवेगळ्या गटात ठेवण्याची केलेली मागणी मागच्या वर्षीच फेटाळली होती. मात्र, दिमित्रीवर शिस्तभंगाच्या कारवाईचे मार्ग खुले असल्याचे युफाने स्पष्ट केले आहे.