मेलबर्न - डाॅक्टरांनी त्याला १२ वर्षांपूर्वी कुस्ती खेळण्यास मनाई केली हाेती. एवढ्यावरच ते डाॅक्टर थांबले नाहीत. ते म्हणाले की, अाता हा चालूदेखील शकणार नाही. कुस्ती तर फारच दूरची गाेष्ट अाहे. मात्र, जिद्द अाणि मेहनतीच्या बळावर त्याने एकदा तरी अाॅलिम्पिकमध्ये सहभागी हाेण्याचे स्वप्न १२ वर्षांनंतर पूर्ण केले, हा संघर्षमय प्रवास अाॅस्ट्रेलियन कुस्तीपटू तल्गात इलियासाेवचा अाहे.
येत्या अाॅगस्टमध्ये ब्राझील येथे हाेणाऱ्या रियाे अाॅलिम्पिक स्पर्धेत तल्गात हा अाॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करेल. ताे पुुरुषांच्या ७४ किलाे वजन गटात नशीब अाजमावणार अाहे. इथपर्यंतचा हा प्रवास साेपा नाही. यादरम्यान माेठी मेहनत घेतली अाणि रियाे अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवले, अशी प्रतिक्रिया इलियासाेवने दिली.
उझबेकिस्तान येथे तल्गात इलियासाेवचा जन्म झाला. मात्र, २००० मध्ये चांगल्या नाेकरीच्या शाेधात ताे अाॅस्ट्रेलियात अाला. यादरम्यान ताे उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय कुस्ती टीममध्ये सहभागी झाला हाेता. या वेळी ताे १९ वर्षांचा हाेता. या ठिकाणी ताे कुस्तीचे धडे गिरवू लागला अाणि फावल्या वेळात कार्पेंटरचे कामही करू लागला. काही काळानंतर त्याची अाॅस्ट्रेलियन कुस्ती संघामध्ये निवड करण्यात अाली. त्यानंतर त्याने अथेन्स अाॅलिम्पिकसाठीची पात्रताही पूर्ण केली. इव्हेंटच्या पहिल्याच दिवशी वैद्यकीय तपासणीमध्ये ताे अपयशी ठरला.
‘पाठीत गाठ अाहे. त्यामुळे ताे कधीही कुस्ती खेळू शकणार नाही. चालणेदेखील धाेकादायक अाहे,’ असे डाॅक्टरांनी सांगितले. हे शब्द माझ्यासाठी अधिक दु:खदायी हाेते. कारण, कुस्ती हा माझा सर्वात अावडता खेळ अाहे. यातूनच मला जगण्याची उमेद मिळाली. त्यानंतर मी अाॅलिम्पिकमधूनही बाहेर झालाे. काही काळानंतर मी डाॅक्टरांच्या त्या विधानाकडे थाेडे दुर्लक्ष करून कुस्तीचा सराव करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पाठीमध्ये काहीसा त्रास जाणवत हाेता. मात्र, कुस्तीपासून पूर्णत: दूर जाणे हे माझ्यासाठी फार कठीण हाेते. याच वेळी माझ्या व्यवसायातही मला माेठी मेहनत करावी लागत हाेती. कार्पेंटरचे काम करताना लाकडे टाकावी लागत हाेते. याच कामातून माझा व्यायाम व्हायचा. २००८ नंतर मी सलग अाठ वर्षे कुस्तीचा सराव करू लागलाे. मात्र, काेणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नाही. गतवर्षी मी पुनरागमन केले. गत १२ महिन्यांत मी दाेन अाॅस्ट्रेलियन किताब जिंकले अाहेत.