आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • US Open 2015: Leander Paes And Martina Hingis Win

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन ओपन टेनिस : पेस-हिंगीस जोडीचे "ग्रँड' यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारताचा ४२ वर्षीय लिएंडर पेस आणि त्याची जोडीदार स्वित्झर्लंडची ३४ वर्षीय मार्टिना हिंगीस यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे. या गोल्डन जोडीचे हे वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम यश ठरले आहे. यापूर्वी या दोघांनी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन ओपनचे किताब जिंकले होते. यूएस ओपनच्या फायनलमध्ये पेस-हिंगीसने अमेरिकेची बेथानी माटेक सँड्स आणि सॅम क्वेरी यांना तीन सेटमध्ये संघर्षानंतर ६-४, ३-६, १०-७ ने हरवले. दुसरीकडे स्पर्धेतील पुुरुष एकेरीच्या फायनलमध्ये नोवाक योकोविक आणि रॉजर फेडरर लढतील.

लिएंडर पेसचे यूएस ओपनमध्ये मिश्र दुहेरीचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने २००८ मध्ये झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत मिश्र दुहेरीचे यूएस ओपनचे ग्रँडस्लॅम जिंकले होते. फायनलमध्ये पेस-हिंगीसने पहिला सेट ६-४ ने जिंकला. मात्र, दुसरा सेट बेथानी माटेक आणि क्वेरी यांनी ६-३ ने आपल्या नावे केला. तिसर्‍या सेटमध्ये पेस-हिंगीसची जोडी एक वेळ २-५ अशी मागे पडली होती. मात्र, दोघांनी जबरदस्त पुनरागमन करताना ६-६ अशी बरोबरी केली. यानंतर पेस-हिंगीसची आघाडी ८-७ अशी झाली. अखेर पेस-हिंगीसने हा सेट १०-७ ने जिंकून "ग्रँड' यश मिळवले. पेस-हिंगीसने सामन्यात ३२ विनर्स आणि दोन एेस मारले. याशिवाय त्यांनी पहिल्या सर्ववर ७८ टक्के गुण मिळवले. िवरोधी अमेरिकन जोडीने साध्या चुका केल्या. त्यांच्या १६ साध्या चुका त्यांच्याच अंगलट आल्या. याशिवाय बेथानी माटेक-क्वेरीने ३ डबल फॉल्ट करून सामना गमावला. पेस-हिंगीसने दुसर्‍या सेटनंतर जबरदस्त पुनरागमन करून सामना आपल्या बाजूने फिरवला.

पेस-हिंगीसने केली विक्रमाची बरोबरी
मार्गेट कोर्ट आणि मार्टी रिसेनने १९६९ मध्ये एका कॅलेंडर वर्षात तीन मिश्र दुहेरीचे किताब जिंकले होते. आता ४६ वर्षांनंतर पेस-हिंगीसने त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताच्या अनुभवी पेसचे हे कारकीर्दीतील १७ वे ग्रँडस्लॅम ठरले. त्याची जोडीदार स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसचे हे १९ वे ग्रँडस्लॅम आहे. यात ५ एकेरीचे, १० महिला दुहेरी आणि ४ मिश्र दुहेरीचे आहेत. पेसच्या १७ ग्रँडस्लॅममध्ये आठ पुरुष दुहेरीचे तर ९ मिश्र दुहेरीचे आहेत. त्याने एकूण ५५ किताब जिंकले आहेत.

हिंगीस लिजेंड...
मार्टिना कोर्टवर आणि बाहेरसुद्धा लिजेंड आहे. ती माझी खूप चांगली मैत्रीण आणि खूप उत्तम व्यक्ती आहे. मार्टिना तंत्रात माझ्यापेक्षा सरस आहे, तर कधीही हार न मानण्याच्या माझ्या स्वभावाने आम्ही विजयी ठरू शकलो. - लिएंडर पेस, विजयानंतर.