आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijay Chaudhary Of Jalgaon Won Maharashtra Kesari Title

विजय चौधरी डबल महाराष्ट्र केसरी, मुंबईच्या विक्रांत जाधवला केले चीतपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पलट, सरक, जरा फिरून, जोर लाव, अरे त्याला अस्मान दाखव, मार धोबीपछाड अशा प्रेक्षकांच्या प्रेरणादायी शब्दांनी बाहू वटारलेल्या जळगावच्या विजय चौधरीने ६ मिनिटांची लढत संपण्यास ३० सेकंद शिल्लक असताना अप्रतिम लपेट डाव टाकून मुंबई पूर्वचा रांगडा पहिलवान विक्रांत जाधवला चीत करून आकाश दाखवले अन् सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब, एक लाख रु. रोख अन् वीर बजरंगबलीचा आशीर्वाद म्हणून चांदीची गदा पटकावली. उपविजेत्या विक्रांत जाधवला रोख ५० हजार रु. प्रदान करून गौरव करण्यात आला. दोन्ही पहिलवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हिंद केसरी रोहित पटेल, माजी महाराष्ट्र केसरी ज्ञानेश्वर मंगळे अन् अमोल बुचडे यांचा पठ्ठा असलेला विजय चौधरी (निळा पोशाख) आणि माजी आॅलिम्पियन व आशियाई सुवर्णपदक विजेता पहिलवान काका पवारचा दणकट शिष्य मुंबई पूर्वचा विक्रांत जाधव (लाल पोशाख)यांच्यात केसरी पदासाठी रंगलेली झुंज नागपूरकर प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मराठमोळी परंपरा लाभलेल्या लाल मातीतील उत्सवाची मौज देऊन गेली. प्रेक्षकांच्या नजरा मध्यभागी असलेल्या गादीच्या आखाड्यावर खिळल्या होत्या. मल्लांच्या प्रत्येक हालचाली उपस्थितांच्या हृदयाचे ठोके चुकवत होत्या. जळगावचा मातब्बर पहिलवान विजय चौधरी हा सहावा डबल महाराष्ट्र केसरी होय. विजय चौधरी महाराष्ट्र केसरी बनल्यानंतर संपूर्ण स्टेडियमवर त्याच्या नावाचा जयजयकार झाला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीसह भगवे पताके हवेत फिरवत या जेतेपदाचे स्वागत करण्यात आले.

संपूर्ण राज्यभरातील कुस्तीपटूंची पंढरी अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची ख्याती आहे. ही लढत बघण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने हजर होते. त्यांच्याच हस्ते विजेत्या मल्लाला चांदीची गदा, पट्टा आणि एक लाख रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही लढत बघण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी राज्यभरातून आले होते. या वेळी माजी महाराष्ट्र, हिंद केसरी खेळाडूंची उपस्थिती होती.

लपेट डाव टाकत मिळवला "विजय'
फायनलमध्ये विक्रांत जाधव आणि विजय चौधरी या दोघांनी नकारात्मक सुरुवात केली. दोघांनी सुरुवातीला २ मिनिटे एकमेकांना अाजमावण्यात वेळ घालवला. विक्रम बचावात्मक खेळत असल्याने पंचांनी पॅच्यू देऊन विजय चौधरीला एक गुण बहाल केला. तिसऱ्या मिनिटाला विजय चौधरीने एकेरी पट काढून २ गुण मिळवले. यानंतर मध्यंतर झाले. ब्रेकनंतर पुन्हा कुस्ती सुरू होताच विक्रांत जाधवने आक्रमक खेळ केला. विक्रांतने चपळतेने दुहेरी पट काढताना २ गुण मिळवले. यानंतर पंचांनी दोन्ही मल्लांना पॅच्यू देऊन प्रत्येकी १ गुण िदला. या वेळी स्कोअर विजय ४ आणि विक्रांत ३ असा होता. हाच स्कोअर पुढेही कायम राहिला. सामना संपायला अर्धा मिनिट शिल्लक असताना विक्रांतने आक्रमक खेळ करताना एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजयने त्याचे आक्रमण रोखून स्वत: दुहेरी पट पटकावर आक्रमण केले. यानंतर लपेट डाव मारून विक्रांतला चीतपट केले. विजयने शेवटचे ५ ते ७ सेकंद शिल्लक असताना लपेट डाव मारून बाजी मारली.

माती गटात सोलापूरला मिळाले सांघिक जेतेपद
सोलापूर विभागातील पहिलवानांनी माती विभागात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर सोलापूर विभागाने १७ गुणांसह सांघिक जेतेपद पटकावले. पुणे विभागाने १३ गुणांसह उपविजेतेपद, तर लातूर विभागाने १० गुणांसह तृतीय स्थानावर ताबा मिळवला.

८६ किलोमध्ये दत्ता नरळेला विजेतेपद
८६ किलो माती प्रकारात सोलापूरच्या दत्ता नरळेने बीडच्या नासीर सय्यदला अप्रतिम डाव मारून चीत केले अन् १०-० गुणांनी सोनेरी पदकावर ताबा मिळवला. सांगलीच्या हर्षवर्धन थोरातला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

अहमदनगरच्या विक्रम शेटेने पटकावले सुवर्ण
गादी प्रकारातील ९७ किलो वजन गटात अहमदनगरच्या विक्रम शेटेने अनिरुद्ध पाटीलला चीत करून अजिंक्यपद पटकावले. विक्रम शेटेने सुरुवातीपासून दमदार खेळ करून या लढतीवर आपले निर्विवाद वर्चस्व राखले.

सर्व चाहत्यांचे मनापासून आभार
मला फक्त नागपूर किंवा जळगावच्या चाहत्यांनी समर्थन दिले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातून मला पाठीराखे मिळाले. चाहत्यांच्या प्रेमाचे, समर्थनाचे मी मनापासून आभार मानतो. मी यापुढेही कुस्तीत दमदार प्रदर्शन करून चाहत्यांचे मने जिंकत राहीन.
विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी विजेता

महाराष्ट्र केसरी आता पोलिस अधिकारी
कुस्ती या खेळाला राजमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. राज्य सरकारतर्फे दिले जाणारे क्रीडा पुरस्कार हे ज्या वर्षीचे त्या वर्षी दिले जावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे महाराष्ट्र केसरीला चांगल्या पदावर पोलिसांत थेट नियुक्ती दिली जाईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS