आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय चौधरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी, पुण्याच्या अभिजित कटकेला हरवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अमोल बुचडे, रोहित पटेल, ज्ञानेश्वर मंडगे यांचा पठ्ठ्या, जळगावच्या विजय चौधरीने महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धेत शनिवारी इतिहास रचला. पुण्याच्या अभिजित कटकेला पराभूत करून विजयने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. नरसिंग यादवनंतर सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याचा पराक्रम २८ वर्षीय विजयने केला.

विजय चौधरी अनुभव आणि ताकदीच्या जोरावर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकू शकला. दोन्ही कुस्तीगीर कुस्ती सुरू झाल्यानंतर उजव्या पवित्र्यात खेळत होते. पण सुरुवातीला अभिजितचा पवित्रा बघून तो चांगले आक्रमण करेल असे वाटत होते. मात्र, िवजय चौधरीच्या अनुभव आणि शक्तीसमोर अभिजितला आक्रमण करता आले नाही. दुसरीकडे विजय सलग दोन मिनिटे आक्रमण करत होता. या वेळी अभिजित मागे सरकत होता. अभिजित कुस्ती करत नसल्याने पंचांनी त्याला पॅथ्यू दिला. यामुळे विजयची एक गुणाची कमाई झाली. निर्धारित ३ मिनिटांचा वेळ संपला. ३० सेकंदांची दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. पुन्हा कुस्ती सुरू झाल्यानंतर अभिजित विजयवर आक्रमण करू शकला नाही. उलट विजयच आक्रमण करत होता. या वेळीही अभिजित डावपेच करत नसल्याने पंचांनी पुन्हा एकदा त्याला पॅथ्यू दिला. यामुळे विजयला दुसरा गुण मिळाला. अशा प्रकारे विजयने २-० ने आघाडी घेतली.

शेवटच्या दीड मिनिटांत अभिजितने पट काढण्यासाठी तीन आक्रमणे केली. मात्र, विजयने तीन आक्रमणे परतवली आणि स्वत:चा बचाव करत विजयाची गदा मिळवली. याप्रकारे २-० अशा गुणफरकाने विजय चौधरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला.

या कुस्तीचे हे वैशिष्ट्य
मागच्या दोन वर्षांपासून विजय जिंकत होता. याच अनुभवाच्या जोरावर विजयने नवख्या अभिजितला हरवले. अभिजितही चांगला मल्ल होता. मात्र, िवजयची शक्ती आणि अनुभव कामी आला. या सामन्यात अनुभव जास्त निर्णायक ठरला. या कुस्तीत कोणतेच डावपेच झाले नाहीत, हे विशेष. अभिजितने शेवटी तीन पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यात अपयशी ठरला. त्याने हेच पट सुरुवातीला काढण्याचा प्रयत्न केला असता तर सामन्याचा निकाल वेगळासुद्धा लागू शकला असता. फायनलला शरद पवार यांची उपस्थिती होती.

यामुळे विजय ठरला तिसऱ्यांदा विजेता
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजय कुस्तीचा खेळसुद्धा डोक्याने खेळतो. तो कमी वेळेतसुद्धा खूप डोके वापरतो आणि कुस्ती जिंकतो. कुस्तीमध्ये शक्ती व युक्तीचा सुरेख संगम करून विजयने गत तीन वर्षांपासून महाराष्ट्र केसरीची गदा राखली.
- विजय कुस्तीच्या आखाड्यावर हजरजबाबी आहे. विरोधी मल्लाच्या देहबोलीवरूनच तो त्याचे डाव अोळखतो आणि त्यानुसार आपला खेळ करतो.

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतरही विजयी
गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतरही विजय चौधरीने गतवर्षी किताब आपल्या नावे केला होता. त्याचा खेळ संपला असे वाटत असतानाही त्याने जोरादार मुसंडी मारत सर्वांना आश्चर्यचकित केले. खान्देशातील अनेक पहिलवानांनी मैदाने गाजवली आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी या किताबाला गवसणी घालणारा विजय चौधरी पहिलाच मल्ल ठरला आहे.

मुख्यमंत्र्यांना आश्वासनाचा विसर
गत वर्षी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्यांना केसरीची गदा पटकावणाऱ्या विजय चौधरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलात नोकरी देेण्याची घोषणा केली होती. ते आश्वासन अद्यापही पाळले गेले नाही. मात्र मुख्यमंत्री कार्यालयातर्फे अद्यापही नोकरीबाबत विजयशी चर्चा करण्यात आली नाही.

अश्पाकला रौप्य
औरंगाबादच्या अश्पाक शहाने माती गटात ७० किलोमध्ये रौप्यपदक पटकावले.पळशीचा हा मल्ल भगवती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सोमीनाथ पळसकर आणि नाशीर शहा यांचा पठ्ठा आहे.
बातम्या आणखी आहेत...