आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि पदकातील अंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थेट रिओतून... भारताचे हे दोन संभाव्य विजेते अखेरच्या क्षणी कणखर मानसिक क्षमतेअभावी कमी पडले....
दक जिंकायला शेवटचा ‘पंच’ लागतो. रिओमध्ये भारताच्या शूटर जितू राय आणि वेटलिफ्टर मीराबाईसाठी तो कमी पडला. परफॉर्मन्स आणि पदक यांच्यात महत्वाचे अंतर असते ते मानसिक सक्षमतेच्या परिपूर्णतेचे. शनिवारी भारतीय तेथे कमी पडले. शूटर जितू राय आणि वेटलिफ्टर मीराबाई या दोन्ही खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास आश्चर्यजनकच म्हणावा लागेल. जितू राय नेपाळच्या शंखुवा सभा या दुर्गम भागातून आलेला. भारतीय लष्कराच्या गोरखा रायफल बटालियनमध्ये शिपाई म्हणून आला. गुणवत्तेमुळे आता नायब सुभेदारच्या पदापर्यंत पोहोचला. २०१०-११ मध्ये नेमबाजीतील अचूकता पाहून त्याला लष्कराच्या शूटिंग चमूत स्थान मिळाले. तेथे त्याने अपेक्षाभंग केला आणि पुन्हा गोरखा रायफलमध्ये त्याची रवानगी झाली. अपेक्षांची स्वप्ने दाखवून नंतर ती भंग करणे बहुधा जितू रायच्या पाचवीलाच पुजलेले असावे. कारण रिओमध्ये १६ व्या स्थानावरून शेवटच्या प्रयत्नांत सहाव्या स्थानावर झेप मारून त्याने आपल्याबद्दल खूपच अपेक्षा निर्माण केल्या. अंतिम फेरीच्या सरावातही त्याच्या गोळ्यांनी ‘परफेक्ट टेन’च्या पलीकडे लक्ष्य साधले. तेव्हा वाटले होते आज एक पदक भारताला नक्कीच मिळणार. अंतिम फेरीत मात्र पुन्हा एकदा जितू रायला सतत हुलकावणी देणाऱ्या अनिश्चिततेचा अनुभव आला. मिनिटांपूर्वी ‘बुल्स आय’मध्ये थेट गोळी मारणाऱ्या जितू रायचे लक्ष्य चुकायला लागले. पहिल्याच प्रयत्नात तो १०च्या बाहेर फेकला गेला. खराब सुरुवात जितू रायच्या पुढील लक्ष्यावर परिणाम करणारी ठरली. पहिल्या १० गुणांची नोंद करण्यासाठी त्याला बरीच प्रतीक्षा करावी लागली. काही क्षणांपूर्वी १०.८ पर्यंत गुणांचे लक्ष्य साधणारा जितू राय आणि भारताच्या पदकांच्या आशा धुळीला मिळाल्या. चार वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरले. त्याला अपयश धुऊन काढण्याची संधी ५० मीटर्स एअर पिस्तूलमध्ये आहे. मात्र त्याच्या गुणवत्तेपेक्षाही त्याला मानसिक सक्षमतेची गरज आहे, जो त्याचा आतापर्यंतच्या यशाचा बालेकिल्ला होता.

जी गोष्ट जितू रायच्या बाबतीत घडली तीच वेटलिफ्टर मीराबाईच्या बाबतीतही घडली. पदकांची अपेक्षा निर्माण करून ती अखेरच्या क्षणी बाहेर गेली. भारताच्या सुदैवाने या वेळी ४८ किलो वजनी गटात महिलांमध्ये चिनी स्पर्धकांचे आव्हान नव्हते. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने क्लीनमध्ये ९२ तर जर्कमध्ये १०८ किलो वजन उचलले होते. स्नॅचमध्ये केवळ एकच ‘लिफ्ट’ ८२ किलोची उचललेल्या मीराबाईचे कांस्य थोडक्यात हुकले. कारण क्लीन आणि जर्कमध्ये तिला १०७ किलोपर्यंतच्या वजनात एकही वेळा वजन उचलता आले नाही. तिने चाचणीत नोंदवलेली १९२ गुणांची बेरीजही तिला ऑलिम्पिकचे पदक निश्चित देऊन गेली असती.

भारताचे हे दोन संभाव्य विजेते अखेरच्या क्षणी कणखर मानसिक क्षमतेच्या अभावी कमी पडले. त्या क्षणाचे दडपण ते सहन करू शकले नाहीत. अन्य देशांच्या तुलनेत भारताने आपल्या खेळाडूंसाठी बऱ्याच सोयी-सुविधा, सवलती दिल्या आहेत. चांगले प्रशिक्षक मानसिक तज्ज्ञ दिले आहेत. खेळाडूंना तक्रार करायला जागा नाही. अन्य गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा पदक पटकावणे हे एकमेव ध्येय असते, तर भारताचे पदकांचे खाते पहिल्याच दिवशी उघडले असते. मीराबाईच्या गटातील सुवर्णपदक विजेतीला अवघे २०० किलो वजन उचलल्यानंतरही यश मिळाले. याचाच अर्थ या गटात फारशी स्पर्धा नव्हती. तरीही आपण सहभागातच समाधान मानणार आहोत.
बातम्या आणखी आहेत...