आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळाबद्दल आपली मानसिकता सुधारण्याची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवाच्या क्रीडाकौशल्याची उंची, वेग, ताकद यांच्या परिसीमा निश्चित करणारा ऑलिम्पिक सोहळा आज पूर्णत्वाला पोहोचला आहे. दर चार वर्षांनी नव्या कल्पना, युक्त्या दाखविणारी स्पर्धा, काहींसाठी केवळ सहभागाचेच निमित्त ठरली. २०६ देशांपैकी १२३ देशांना एकही पदक मिळाले नाही. त्या यादीत हॉकीचा अपवाद वगळता भारतही असायचा. आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. भारताची ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ सहभाग ही ओळख राहिली नाही. पदक मिळाले नाही म्हणून ऊर बडविणाऱ्या भारतीयांपेक्षाही खेळाडूंना प्रोत्साहन देणारे नागरिक, सरकारी यंत्रणा, प्रशिक्षक यांचा आदर करण्याची गरज आहे. भारतात बसून रिओमधील कामगिरीचे मूल्यमापन करणारे सर्वसामान्य भारतीयच नव्हे तर तज्ज्ञ पत्रकार, टीकाकार आणि समाजातील अन्य घटकांनी अंतर्मुख होण्याची खरं तर गरज आहे. टेलिव्हिजन चौकटीच्या पलीकडचे विश्व, स्पर्धा, प्रत्यक्षातील संघर्ष, वातावरण न पाहताच निष्कर्ष काढले गेले.

पदकांसाठी मोठी तपश्चर्या लागते. योजनाबद्ध कार्यक्रम लागतो. आज आपण त्यात परिपूर्ण नाही, हे सत्य आहे. मात्र त्याचा अर्थ आपण काहीही करत नाही, असा नाही. आज प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी जगातील सर्व प्रबळ क्रीडाशक्ती, त्या देशांचे स्पर्धक आणि पत्रकार मंडळी भारतीय खेळाडूंबाबत सतत जागरूक असतात. त्यांची माहिती, रेकाॅर्ड्स येथे पडताळून पाहात असतात. भारताव्यतिरिक्त अमेरिका, युरोप, चीन, जपान यांसारख्या देशांचे क्रीडाशौकीन भारतीयांसाठी टाळ्या वाजविताना दिसतात. नेमबाज अभिनव बिंद्राच्या हुकलेल्या कांस्यपदकापासून सुरू झालेली भारतीयांची शोकांतिका १२ दिवसांनंतर थांबली. दुसऱ्या स्थानावरून बिंद्रा चौथ्या स्थानावर गेला. एक शतांश गुणाने त्याचे कांस्यपदक हुकले. हॉकीत ज्या अर्जेंटिनाला आपण हरविले, त्यांनी सुवर्णपदक पटकावले.

टेनिसमध्ये सानिया मिर्झा-बोपन्ना जोडीचे रौप्यपदक हुकले आणि कांस्यपदकाच्या लढतीतही आपण हरलो. जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिचे कांस्यपदक केवळ ६ शतांश गुणांनी हुकले. सुवर्णपदक विजेत्यापेक्षाही दीपाचे त्या वेळी जगभरातील मीडियाने कौतुक केले. अर्धा पान मुलाखती परदेशी वृत्तपत्रांनी छापल्या. भारतासारख्या जिम्नॅस्टिक्सची परंपरा, पार्श्वभूमी नसलेल्या देशातील एक मुलगी तीही भारतीय प्रशिक्षकाच्या साहाय्याने जगातील चार सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणली जाते, पदकापेक्षाही हा बहुमान मोठा आहे. अॅथलेटिक्स हे अमेरिका, जमैका, ब्रिटन, केनिया यांच्या वर्चस्वाचे क्षेत्र. जेव्हा ललिता बाबर (स्टीपलचेसमध्ये) हे नाव अंतिम लढतीच्या सुरुवातीला पुकारले गेले, तेव्हा सर्व समीक्षकांनी तिची माहिती घ्यायला सुरुवात केली. जगातील सर्वोत्तम ८ खेळाडूंत येणे, हे कौतुकास्पद नाही का? एक ऑस्ट्रेलियन पत्रकार व समीक्षक आपल्या समीक्षेदरम्यान म्हणत होता, भारतीय स्पर्धक दत्तू भोकनाल हा (सिंगल स्कल, रोईंग) ‘टफ्’ स्पर्धक आहे. बॅडमिंटनमध्ये तर भारतीय स्पर्धकांपासून जगातील सर्व सर्वोत्तम देश सावध राहायला लागले आहेत. अनफिट सायना प्राथमिक फेरीत हरली, पण सिंधूने तिची जागा घेत, रौप्यपदकाला गवसणी घातली. कुस्तीमध्ये नरसिंग यादवने ज्या मल्लांना जागतिक स्पर्धांमध्ये सहज हरविले होते, त्यांनीच पदके जिंकली. साक्षी मलिकची जिद्द व जिगर पाहण्यासाठी पराभूत व निराश मानसिकतेपलीकडची दृष्टी हवी.

भारतीयांनी गमावलेल्या अनेक लढतीही एकतर्फी नव्हत्या. प्रत्येक पराभूत भरतीय स्पर्धकांच्या चेहऱ्यावर दु:ख होते. भारतीयांनो आम्हाला माफ करा, असं खुल्या दिलानं सांगण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. त्यांच्या झुंजीला, जिद्दीला, प्रयत्नांना प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असलेले क्रीडारसिक दाद देत असताना, स्वकियांकडून होणाऱ्या चिखलफेकीमुळे भारतीय स्पर्धक खऱ्या अर्थाने पराभूत झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...