आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपाय नसताना इंग्लिश खाडी ओलांडली, आता डकार रॅलीत सहभागी होण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्स - त्यास दोन्ही हात नाहीत, दोन्ही पायही नाहीत. तरीही तो कोणावर ओझे नाही. त्याने २०१० मध्ये इंग्लिश खाडी पार करण्याचा आश्चर्यकारक पराक्रम केला आहे. तो जगभरात अपंगांसाठी उमेदीचे उदाहरण आहे. ही गोष्ट आहे फ्रान्सच्या फिलिप क्रोइजोनची. ४८ वर्षीय फिलिपला अाव्हानांचा सामना करणे आवडते. आता त्याने स्वत:साठी नवे आव्हान ठरवले आहे. तो जगातील सर्वाधिक खतरनाक डकार रॅलीत सहभागी होऊ इच्छितो. ही रॅली पुढच्या वर्षी जानेवारीत अर्जेंटिनात होईल. फिलिप म्हणतो, "मला डकार रॅलीत सहभागी व्हायचे आहे.

सेबेस्टियन लोबला (फ्रेंच ड्रायव्हर) आव्हान देणे माझे लक्ष्य नाही. मला तर ही रेस पूर्ण करायची आहे. ही रेस पूर्ण करण्यास मला किती वेळ लागेल, हे सांगता येणार नाही. मात्र, मला फिनिश लाइन क्रॉस करायची आहे.' फिलिप या रेसमध्ये एक स्पेशल मॉडिफाय कार चालवेल. तो म्हणतो, मी स्टिअरिंगला हात लावू शकत नाही. शिवाय मी ब्रेक आणि पॅडललाही पाय लावू शकत नाही. यामुळे स्टिअरिंगच्या जागी जाॅय स्टिक लावली जाईल. याने कार कंट्रोल होईल. जॉय स्टिकनेच कारचा वेग, ब्रेक आणि दिशा निश्चित करता येईल. हे एक प्रकारे व्हिडिओ गेमप्रमाणे आहे.' त्याचा सहकारी ड्रायव्हर मॅथ्यू बोथेटला त्याची खूप मदत करावी लागेल. मॅथ्यू म्हणाला, "या कारचे इंजिन ३४० हॉर्सपॉवरचे आहे. याचा वेग ताशी १५० किमी पोहोचू शकतो. मात्र, फिलिपला रेस जिंकायची नसून केवळ त्याला पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी हे सर्व खूप जास्त आहे. मला गाडी सुरू करून हाॅर्न आणि विंडस्क्रीनही नियंत्रित करावी लागेल.'

दोन दिवसांपूर्वीच फिलिपने आपल्या मॉडिफाय कारची टेस्ट ड्राइव्ह घेतली. फिलिपला आता रोज १० ते १५ तास आपल्या कारमध्ये काढावे लागतील. यामुळे त्याला कारची सवय होईल. रॅलीसाठी तयार होण्यासाठी त्याच्याकडे ८ महिन्यांचा कालावधी आहे. फिलिपने १९९४ मध्ये आपले दोन्ही हात, दोन्ही पाय गमावले होते. घरच्या टीव्हीचा अँटिना दुरुस्त करताना त्याला विजेचा झटका बसला. यानंतर शस्त्रक्रिया करून त्याचे दोन्ही हात, दोन्ही पाय कापावे लागले होते. मात्र, तरीही त्याने जिद्द साेडली नाही.