आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड बॅडमिंटन: सायनाला रौप्यपदक, फायनलमध्ये झाला पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - सायना नेहवाल वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्यास आली तेव्हा तमाम भारतीयांना तिच्याकडून सुवर्णपदकाच्या आशा होत्या. मात्र, गतचॅम्पियन कॅरोलिन मरिनने सायनासह भारताचे स्वप्न भंग केले. मरिनने फायनलमध्ये सायनाला २१-१६, २१-१९ ने पराभूत करून विश्व चॅम्पियनशिपचा किताब कायम ठेवला. तिने या वर्षी ऑल इंग्लंड चॅॅम्पियनशिपच्या फायनलमध्येसुद्धा सायनाला हरवले होते.

दुसरी मानांकित सायनाने शनिवारी वर्ल्ड बॅडमिंटनच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवला होता. मात्र, रविवारी सायनाची जादू चालली नाही. फायनलमध्ये तिच्यासमोर वर्ल्ड नंबर वन कॅरोलिन मरिन होती. अव्वल मानांकित असल्याने मरिनच्या विजयाची
दावेदारीही मजबूत होती. इतकेच नव्हे तर मरिनचा सायनाविरुद्ध विजय-पराभवाचे गणित ३-१ असे असल्याने ती आत्मविश्वासाने कोर्टवर उतरली.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाने फायनलमध्ये चांगली सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये ती एक वेळ ७-५ ने पुढे होती. मात्र, मरिनने सलग सहा गुण मिळवत स्कोअर ११-७ असा केला. यानंतर तिने मागे वळून बघितले नाही आणि गेम २१-१६ ने जिंकला. सायनाने दुसऱ्या गेममध्ये ११-६ ने आघाडी घेतली तेव्हा सामन्याचा निकाल तिसऱ्या गेमपर्यंत जाईल असे वाटत होते. मात्र, मरिनने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करताना सलग सहा गुण मिळवत १२-१२ अशी बरोबरी केली. नंतर
सामना १७-१७ असा पोहोचला. अखेरच्या क्षणी मरिन पुन्हा सायनाला वरचढ ठरली. मारिनने गेम २१-१९ ने जिंकत सामनाही आपल्या नावे केला.
पंचांची ताकीद
मारिन या सामन्यात आपल्या स्वभावाविरुद्ध अधिक आक्रमक दिसली. ती फक्त मोठ्याने ओरडत नव्हती तर तिने बऱ्याच वेळा रॅकेटला आपल्या पायावर मारले. यामुळे चेअर अंपायरने तिला दोन वेळा ताकीद दिली. मात्र, याचा मारिनच्या लयीवर आणि खेळावर काहीच परिणाम झाला नाही. या सत्रात मारिनचा हा सलग चौथा किताब ठरला.

चेन लोंग पुन्हा चॅम्पियन
स्पेनच्या कॅरोलिन मारिनप्रमाणे चीनचा विश्व नंबर वन खेळाडू चेन लोंगनेसुद्धा आपला किताब कायम ठेवला. त्याने पुरुषांच्या फायनलमध्ये माजी नंबर वन मलेशियाच्या ली चोंग वेईला २१
-१४, २१-१७ ने पराभूत केले. चेन लोंगने २०१४ च्या फायनलमध्येसुद्धा चोंग वेईला हरवले होते.

...तर वेगळा निकाल
मी आज माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू शकले नाही. सुरुवातीच्या गेममध्ये मी बऱ्याच चुका केल्या. दुसऱ्या गेममध्येसुद्धा अखेरच्या क्षणी मी विनाकारण एक गुण गमावून बसले. मी संयमाने खेळले असते, तर बहुदा निकाल वेगळा राहिला असता. सायना नेहवाल
भारताचे पाचवे पदक
वर्ल्ड बॅडमिंटनमध्ये हे भारताचे पाचवे पदक ठरले. दोन कांस्य पी. व्ही. सिंधू (२०१३, २०१४) ने जिंकले आहेत, तर ज्वाला गुट्ट-अश्विनी पोनप्पाच्या जोडीने २०११ मध्ये कांस्य मिळवले
होते. भारताला या स्पर्धेत पहिले पदक (१९८३, कांस्य) मिळवण्याचा मान प्रकाश पदुकोण यांना जातो.