आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनल : भारताने पाकला राेखले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एटवर्प - आशियाई चॅम्पियन भारतीय हाॅकी संघाने शुक्रवारी पांरपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला बराेबरीत राेखले. एफआयएचच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलमध्ये या दाेन्ही संघांतील काट्याची लढत २-२ ने बराेबरीत राहिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगतदार सामना झाला. मात्र, ही लढत बराेबरीत सुटल्याने दाेन्ही संघाला प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.

रमणदीपने केलेल्या गाेलच्या बळावर भारताने सामन्यात बराेबरी साधून आपला पराभव टाळला. त्याने ३९ व्या मिनिटाला शानदार गाेल करून संघाला बरोबरी मिळवून दिली. भारताच्या स्टार खेळाडू रमणदीपने (१३, ३९ मि.) सामन्यात दाेन गाेल केले. तसेच पाकिस्तानसाठी इम्रानने (२३, ३७ मि.) दाेन गाेल केले. मात्र, पाकला सामन्यात विजय मिळवता आला नाही.

सलगच्या दाेन विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला रमणदीपने संघाकडून गाेलचे खाते उघडले. यासह भारतीय संघाने १-० ने सामन्यात आघाडी मिळवली. त्यानंतर पाकिस्तानच्या ३६ वर्षीय इम्रानने दाेन गाेल केेले. त्यामुळे पाकला सामन्यात २-१ ने आघाडी घेता आली हाेती. तसेच भारतावर पराभवाचे सावट निर्माण झाले हाेते. याचदरम्यान भारताच्या दाेन खेळाडूंना या वेळी येलाे कार्ड देण्यात आले. मात्र, त्यानंतर रमणदीपने पुन्हा एक गाेल करून सामना बराेबरीत ठेवला.

आयर्लंडकडून चीनचा धुव्वा
पुरुष गटाच्या सामन्यात जबरदस्त फाॅर्मात आलेल्या आयर्लंडच्या टीमने एकतर्फी विजयाची नाेंद केली. या संघाने सामन्यात चीनचा ६-० अशा फरकाने पराभव केला. यासह आयर्लंडने स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. साॅथेन अ‍ॅलेनने (१९,२०, ३३ मि.) तीन गाेल करून विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच पीटर (२२ मि.) आणि गाेर्मिले (३२ मि.) यांनी एक गाेल केला.

पाकला दाेन पेनल्टी काॅर्नर
पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानला सामन्यात दाेन वेळा पेनल्टी काॅर्नरची संधी मिळाली. या दाेन्ही वेळा इम्रानने पाकच्या टीमसाठी गाेल केले. मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही. पाकला सामन्यात गाेलचे खाते उघडण्यासाठी तब्बल दहा मिनिटे झुंज द्यावी लागली. दहा मिनिटांनंतर इम्रानने संघाला १-१ ने बराेबरी मिळवून दिली. त्याने २३ व्या मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवर गाेल केला. त्यानतंर ३७ व्या मिनिटाला त्याने पुन्हा पेनल्टी काॅर्नरवर गाेल केला.

भारतीय महिलांसमाेर आज आॅस्ट्रेलियाचे आव्हान
भारतीय महिला टीमसमाेर शनिवारी बलाढ्य आॅस्ट्रेलिया टीमचे आव्हान असेल. गत सामन्यातील विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता हीच विजयी लय आॅस्ट्रेलियाविरुद्ध कायम ठेवण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल. मात्र, यासाठी रितू राणीच्या नेतृत्वाखाली महिला टीमला माेठी कसरत करावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...