आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनायचे होते यष्टिरक्षक अन् झाला वेगवान गोलंदाज..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
६ फूट ५ इंच उंच मिशेल स्टार्क मैदानावर स्वभावाने आक्रमक आहे. अर्थात वेगवान गोलंदाजीसाठी एकदम परफेक्ट. जबरदस्त याॅर्कर आणि चेंडूला अप्रतिम बाऊन्स करण्याच्या क्षमतेमुळे तो मोस्ट प्राॅमिसिंग युवा वेगवान गोलंदाज म्हणून पुढे आला आहे. मात्र, तो नेहमीच असा नव्हता. त्याला तर विकेटच्या मागे आनंद मिळायचा. क्रिकेट खेळण्याची सुरुवातच त्याने विकेटकीपिंगपासून केली. सोबत तो आवड म्हणून गोलंदाजीही करायचा.   

३० जानेवारी १९९० रोजी बाॅल्कहॅम हिल्स (सिडनी) येथे जन्मलेल्या स्टार्कने वयाच्या ६, ७ वर्षांपासूनच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याला यष्टिरक्षण आवडायचे. ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट त्याचा आवडता खेळाडू. तो त्याचे अनुकरण करायचा. त्याला बालपणापासून यष्टिरक्षक बनायचे होते. शाळेच्या सामन्यांत तो यष्टिरक्षकच असायचा. गोलंदाजी आणि त्यातसुद्धा वेगवान गोलंदाजीचा तर त्याने कधीच विचार केला नाही. सिडनीच्या बेराला स्पोर्ट््स क्लबकडून खेळता खेळता त्याने गोलंदाजी सुरू केली अन् तीसुद्धा वयाच्या १५, १६ व्या वर्षी. त्या वेळी तो यष्टिरक्षणाला प्राधान्य द्यायचा. यष्टिरक्षण आणि गोलंदाजी दोन्ही करू शकणाऱ्या क्लबचा खेळाडूंत स्टार्कचा समावेश होता.  

काही दिवसांनी संघाच्या मॅनेजरने त्याला हेरले. इतकी शानदार गोलंदाजी करणारा विकेटच्या पाठीमागे काय करतोय, असा विचार कोचने केला. कोचने त्याला यष्टिरक्षकाचे ग्लोव्हज सोडून गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. स्टार्कने त्यांचे ऐकले आणि चार वर्षांतच त्याने न्यू साऊथ वेल्सच्या संघात स्थान मिळवले. २००९-१० च्या शेफिल्ड शिल्ड सत्रात २१ बळी घेऊन त्याने सर्वांचे लक्ष वेधले. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात सामील झाला. पुढच्या वर्षी कसोटी संघात निवड होताच एका युवा खेळाडूच्या शानदार करिअरची सुरुवात झाली. या गोलंदाजाने वेगवान गोलंदाजाचा विक्रम मोडला. सर्वात वेगाने १०० वनडे बळी घेण्याचा १९ वर्षे जुना विक्रम त्याने मोडला.   
 
यष्टिरक्षण त्याला खूप आवडायचे तरीही तो यष्टिरक्षक मात्र बनू शकला नाही. मात्र, तो एका विकेटकीपरच्याच प्रेमात पडला. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची विकेटकीपर एलिसा हेलीशी त्याने बरेच दिवस डेटिंग केले. दोघांनी मागच्या वर्षी लग्न केले. क्रिकेटच्या इतिहासात कसोटी खेळणारी ही जगातील केवळ तिसरी जोडी आहे. स्टार्कचा लहान भाऊ लांब उडीपटू आहे. त्याने रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.  

 वेगवान गोलंदाज स्टार्क मैदानात खूप अाक्रमक असला तरीही त्याला खाण्यात गोड खूप आवडते. आइस्क्रीम आणि चॉकलेट तर त्याला इतके आवडते की फिटनेसचा विचार न करता तो त्यावर तुटून पडतो. त्याने ट्विटर प्रोफाइलवर स्वत:ला “स्वीट लव्हर’ लिहिले आहे. गोड पदार्थाची लालूच देऊन स्टार्ककडून काम करता येते, असे त्याचे सहकारी खेळाडू म्हणतात.   स्टार्क यष्टिरक्षण आणि गोलंदाजीशिवाय क्रिकेटच्या आणखी दोन गोष्टीत तरबेज आहे.
 
क्षेत्ररक्षण करताना त्याचा वेग आणि चपळता पाहण्यासारखी असते. शिवाय तो तळाचा भरवशाचा फलंदाज आहे. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याच्या नावे असा विक्रम आहे, जो कोणत्याही फलंदाजाला आवडणार नाही. कसोटीत नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो ९९ धावांवर बाद होणारा पहिला फलंदाज आहे.
 
बातम्या आणखी आहेत...