आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा क्षेत्रातील पद्म पुरस्कारांवरही क्रिकेटचेच वर्चस्व; 54 वेळा गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक ‘पद्म’ पुरस्कारांच्या बाबतीत क्रीडा क्षेत्राने भरारी घेतली आहे. मात्र, आजवरच्या आकडेवारीचा विचार केल्यास त्यातही क्रिकेटनेच बाजी मारली आहे. 
 
१९५४ पासून आजवर वितरित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांपैकी २१८ पुरस्कार विविध क्रीडा प्रकारांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक तसेच क्रीडा तज्ज्ञांना देण्यात आले. यापैकी १८७ पद्मश्री, २७ पद्मभूषण आणि ३ पद्मविभूषण तर एकमेव भारतरत्न पुरस्काराचा समावेश आहे. मात्र, त्यापैकी तब्बल २५ टक्के अर्थात ५४ पुरस्कारांवर क्रिकेटचाच दबदबा दिसतो. गिर्यारोहकांना ३४ व हॉकीपटूंना २५ वेळा पद्म पुरस्कार मिळालेे आहेत. 
 
विशेष म्हणजे, क्रीडा क्षेत्रात पद्म पुरस्कार मिळवण्याच्या बाबतीत ३३ पुरस्कारांसह महाराष्ट्र आघाडीवर आहे. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्काराने आजवर एकाच क्रीडापटूला म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सन्मानित करण्यात आले आहे. भारतरत्न मिळवणारी ही एकमेव व्यक्तीसुद्धा क्रिकेट जगताशी संबंधित आहे.

हॉकी दुर्लक्षितच
क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा विचार करता भारतीय हॉकी संघाने या क्षेत्राला एक सुवर्णकाळ दिला आहे. तब्बल ८ वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा करिश्मा भारतीय हॉकी संघाने केला आहे. मात्र, आतापावेतो हॉकीतील २५ खेळाडूंनाच पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. मागील अनेक दशकांपासून हॉकीचे जादूगार मानले जाणारे मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न बहुमानाने सन्मानित करण्याची मागणी होत आहे. मात्र, असे होऊ शकलेले नाही.

सचिन, आनंद यांना तिहेरी गौरवाचा मान
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनाच आतापर्यंत तीन वेळा पद्म पुरस्कार मिळाला आहे. सचिनला पद्मश्री, पद्मभूषणसोबतच भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. तर, विश्वनाथन आनंदला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही बहुमान मिळाले आहेत. शिवाय, क्रीडा क्षेत्रातील १२ खेळाडूंना आजवर दोन पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये कपिलदेव, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, लिएंडर पेस, बॅडमिंटनपटू गोपीचंद, बॉक्सर मेरी कोमचा समावेश आहे.

महाराष्ट्रीयन विजेत्यांत निम्म्याहून अधिक क्रिकेटपटू
भारताच्या पद्म पुरस्कारांच्या इतिहासात आजवर महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार दिले गेले असले तरी क्रीडा क्षेत्रात निम्म्याहून अधिक फक्त क्रिकेटपटूनांच मिळाले आहेत. १९६२ मध्ये क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर आणि पॉली उम्रीगर यांना महाराष्ट्रातून पहिल्यांदाच क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. नुकताच क्रिकेटपटू विराट कोहलीलाही हा बहुमान मिळाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...