आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिका गमावली : दुसरा वनडे जिंकत बांगलादेशची २-० ची आघाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर अवघे जग भारतीय "योगा'मध्ये आसनस्थ झाले असताना मीरपूरमध्ये भारतावर बांगलादेशपुढे "शीर्षासन' करण्याची वेळ आली. सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सपाटून मार खात भारताने बांगलादेशविरुद्धची तीन सामन्यांची मालिकाही गमावली. २०० धावांचे माफक आव्हान केवळ ४ गड्यांच्या बदल्यात पार करत बांगलादेशने हा सामना ३८ षटकांत जिंकला.
टीम इंडियाने टॉस जिंकून दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, धोनीचा हा निर्णय सपशेल चुकला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ४५ षटकांत सर्वबाद २०० धावा केल्या.
सलामीवीर रोहित शर्मा भोपळा न फोडताच पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याला मुशाफिजूरने शब्बीरकरवी झेलबाद केले. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची उपयुक्त भागीदारी केली. नासिर हुसेनने १३ व्या षटकात कोहलीला पायचीत केले. कोहली बाद होताच भारताचा डाव गडगडला. पुढच्या फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. कोहलीने २७ चेंडूंत १ षटकार, ३ चौकारांसह २३ धावांचे योगदान दिले. धवनने ६० चेंडूंचा सामना करत ७ चौकारांसह ५३ धावा काढल्या.

धवन, धोनीची झुंज
भारताकडून सलामीवीर शिखर धवनने ५३, तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ४७ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय इतरांनी निराशा केली. मधल्या फळीत सुरेश रैनाने धोनीची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ३४ धावा काढून चालता झाला. अष्टपैलू रवींद्र जडेजादेखील मोठी खेळी करू शकला नाही. तो अवघ्या १९ धावा करत तंबूत परतला.

सकिबचे शानदार अर्धशतक
प्रत्युत्तरात बांगलादेशकडून सकिब अल हसनने शानदार नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने ६२ चेंडंूत ५ चौकार लगावत ५१ धावा काढल्या. सलामीवीर तमीम इक्बालने १३, तर सौम्य सरकारने ३४ धावा जोडल्या. दासने ३६ आणि मुशाफिजूर रहेमानने ३१ धावांचे योगदान दिले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या साबिर रहेमानने नाबाद २२ धावांची विजयी खेळी केली.
बातम्या आणखी आहेत...