आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajinkya Rahane Said The He Was Not Shocked By Decision Of Captainship

नेतृत्वाच्या नव्या जबाबदारीने धक्का नाही, जबाबदारी नाकारत नाही : रहाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन युवा अजिंक्य रहाणेची कर्णधारपदी निवड झाली. भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबाबत दस्तुरखुद्द अजिंक्यलाच विचारल्यानंतर तो म्हणाला, निवड अपेक्षित नव्हती, मात्र धक्का वगैरे काही बसला नाही. कारण, मीदेखील अपेक्षा ठेवत नाही. असे असले तरी जबाबदारी टाकल्यानंतर मी नाकारतही नाही.

अजिंक्य म्हणाला, "मला नवोदित खेळाडूंचा संघ दिल्याबद्दलही आनंद झाला. कारण हे सर्व खेळाडू स्थानिक क्रिकेट स्पर्धेत, आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीची छाप सातत्याने पाडत होते. प्रत्येक परदेश दौरा हा आव्हानात्मकच असतो. परदेशातील वेगळे हवामान, वेगळ्या खेळपट्ट्या आणि स्थानिक संघाला पाठिंबा देणारे प्रेक्षक यामुळे हे ‘चॅलेंज’ स्वीकारण्यात खरी मजा असते.'

धोनीकडून शिकलो
पुढे तो म्हणाला, "नेतृत्वाचा माझा अनुभव मुंबई १९ वर्षांखालील संघाचे कप्तानपद आणि इंडियन ऑइल संघाचे नेतृत्व असा आहे. मात्र धोनीसारख्या यशस्वी भारताच्या कप्तानाच्या हाताखाली खेळल्यामुळे बरेच शिकलो. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता शांतपणे डावपेच आखणारा आणि ते कार्यान्वित करणारा धोनी बरेच शिकवतो. धोनीचा शांतपणा मी स्वीकारला आहे, तर विराट कोहलीचे नियंत्रणात राहून केलेले आक्रमण मला आवडते.'

राजस्थान रॉयल्सतर्फे खेळताना राहुल द्रविडकडून फलंदाजीबाबत बरेच काही शिकलो. नेतृत्वाचे बोलायचे झाल्यास राहुल द्रविड अतिशय सरळ, सोप्या परिभाषेत नेतृत्वगुणाची व्याख्या निश्चित करतो, असे मुंबईच्या या युवा फलंदाजाने नमूद केले.

माझीही वेगळी शैली
प्रत्येक कप्तानाची नेतृत्व करण्याची वेगळी शैली असते. माझीही स्वत:ची वेगळी शैली आहे. त्या क्षणी जे योग्य वाटेल ते प्रत्यक्षात उतरवण्याचा मी प्रयत्न करीन. माझे सहकारी नवोदित आहेत, प्रथम त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे, असे तो म्हणाला.