आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेच खेळाडू पुढच्या वर्ल्डकपपर्यंत कायम ठेवा माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - नुकत्याच झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी कौतुकास्पद असून त्याच संघाला पुढील विश्वचषकापर्यंत कायम ठेवायला हवे, असे मत भारताचे माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केले. या खेळाडूंना सतत संधी मिळाल्यास पुढील विश्वचषक ते नक्कीच भारतात आणू शकतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला .

महेंद्रसिंग धोनी याच्या संपूर्ण संघाने विश्वचषकात चांगली कामगिरी केली. केवळ एक सामना हरल्यानंतर ते विश्वचषकाबाहेर फेकले गेले. तेदेखील विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभूत झाले असल्याने भारतीय चाहत्यांनी निराश होण्याचे कारण नाही. हा माझा शब्द आहे. जर हाच संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकापर्यंत कायम ठेवला गेल्यास त्यात भारतच जिंकेल, असेही त्यांनी नमूद केले. आपल्याकडे खूप चांगले फलंदाज आणि गोलंदाज असून अजून थोडा अनुभव त्यांच्याकडे असल्यास ते विश्वचषकावर कब्जा मिळवू शकतील. यात मला शंका वाटत नाही, असेही ते म्हणाले.
धोनीच सर्वोत्तम पर्याय

उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर धोनीबाबत कोणी काही म्हटले तरी धोनी हाच नेतृत्वासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे. त्याच्यापेक्षा अधिक चांगला पर्याय सध्या तरी आपल्याकडे उपलब्ध नसल्याने धोनी तंदुरुस्त असेपर्यंत त्याच्याकडेच नेतृत्व कायम ठेवावे. या खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळाल्यास ते विश्वचषकासाठी तयार होतील, असेही गायकवाड म्हणाले.
मध्यफळीकडून निराशा

संघाच्या कामगिरीपैकी मध्यक्रमातील फलंदाजांनीच काहीशी निराशा केल्यामुळेच उपांत्य सामना आपल्या हातून निसटल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. ३२९ चा पाठलाग करताना चांगली सलामी दिली होती. मधल्या फळीने झटपट विकेट टाकल्यामुळे सामन्याचे चित्र पालटले.