आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई सुपरकिंग्जच्या हस्तांतरणासाठी अर्ज, किंमत अवघी पाच लाख दाखवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीसीसीआयवरील आपली पकड ढिली पडू नये यासाठी सतत प्रयत्नशील असणा-या एन. श्रीनिवासन यांनी आपले बस्तान देशाच्या या राष्ट्रीय क्रिकेट संस्थेवर बसविण्याच्या दृष्टीने पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने, ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’चा मुद्दा महत्त्वाचा मानल्यामुळे, श्रीनिवासन यांना चेन्नई सुपरकिंग्ज किंवा बीसीसीआय यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे.

नवनिर्वाचित आयपीएल कौन्सिलसमोर चेन्नई सुपरकिंग्जच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव पहिल्याच बैठकीत आला आहे. श्रीनिवासन यांच्या प्रस्तावामुळे आयपीएल कौन्सिल हबकलीच. कारण श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपरकिंग्जची हस्तांतरण करतानाची किंमत दाखविली आहे अवघी पाच लाख रुपये. त्यांनी निश्चित केलेल्या त्या किमतीच्या पाच टक्के रक्कम म्हणजे २५ हजार रुपये श्रीनिवासन यांनी हस्तांतरण फी म्हणून बीसीसीआयकडे जमा केली आहे.

नेमक्या याच मुद्द्यावर आयपीएल कौन्सिलच्या बैठकीत खडाजंगी झाली. फायनान्स कमिटीचे चेअरमन ज्योतिरादित्य शिंदे हे आयपीएल कौन्सिलवर नियुक्त करण्यात आलेले विशेष निमंत्रित आहेत. श्रीनिंची चलाखी कौन्सिलच्या लक्षात आली.

श्रीनिंकडून धूळफेक
चेन्नई सुपरकिंग्ज विकत घेण्यासाठी आर्थिक रसद पुरविणारी इंडिया सिमेंट ही कंपनी शेअर बाजारातील एक मोठी कंपनी आहे. अशा कंपनीच्या फ्रँचायझीची किंमत एवढी अल्प असावी याचेच या सदस्यांनाही आश्चर्य वाटले. चेन्नई सुपरकिंग्जसारख्या फ्रँचायझीची किंमत पाच लाख रुपये निश्चित करणे हीच मोठी धूळफेक आहे. श्रीनिवासन यांच्या समर्थकांनी हस्तांतरणाचा प्रस्ताव पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्येष्ठ सदस्यांनी त्या प्रस्तावाला विरोध केला आहे. हस्तांतरणाची ही प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने होता कामा नये, असाही सदस्यांचा आग्रह आहे.

‘ग्रीन सिग्नल’ मिळेल का ?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपरकिंग्जचे मालकी हक्क, आपल्याच कंपनीच्या दुस-या एखाद्या ‘ट्रस्ट’कडे हस्तांतरित केल्यास, त्याला सर्वोच्च न्यायालयाचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे.

पुन्हा प्रवेशाचे प्रयत्न ?
बीसीसीआयच्या बाहेर जाऊनही श्रीनिवासन हे स्वस्थ बसलेले नाहीत. बीसीसीआयमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी चोरवाटेने क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात शिरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.