आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध खेळाडूंच्या कर्तृत्वाने उजळल्या दाही दिशा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-
चांद तारों के जो खुद हो मोहताज
भीख ना मांगो उजालों की बूंद की
आंखों से ऐेसे काम करो कि
आंखो खुल जाए आंखवालों की...

या दिवंगत प्रख्यात कवी आणि संगीतकार रवींद्र जैन यांच्या प्रेरणादायी ठरलेल्या चार ओळींप्रमाणे अनेक अंधांनी आपले विश्वच चमकवून टाकले. दैवी प्रकोपाने जन्मत: अंधत्वाच्या अभिशापाला बळी पडलेल्या अंध खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर दाही दिशा उजळून टाकल्या आहेत. महाराष्ट्रातील अंध खेळाडूंनी मेहनत आणि आत्मविश्वासातून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये झगमगाट केला आहे.

नेहाचे १७ हजार फुटांवर गिर्यारोहण
उमेदीत अंधत्वावर मात करून नेहा पावसकरने प्रकाशमान केलेले विश्व अनेकांना प्रेरणादायी आहे. जलतरण, ज्युदो, बुद्धिबळ, अॅथलेटिक्समध्ये त्यांनी ओेळख निर्माण केली. गोळाफेक व थाळीफेकमध्ये सुवर्णची कमाई केली. याशिवाय त्यांनी गिर्यारोहणामध्येही नैपुण्य दाखवले. त्यांनी १९९९ मध्ये १७ हजार २२६ फूट उंच असलेल्या शितीधर शिखरावर गिर्यारोहणही केले आहे.

कृष्णाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर बाललीला!
मुंबईतील कृष्णा निमशेटे या ११ वर्षीय चिमुकल्याचेही आयुष्य जन्मापासून अंधारमय आहे. केवळ इच्छाशक्ती व मेहनतीच्या आधारे त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली. तायक्वांदो खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पदक मिळवून देणारा हा पहिला युवा खेळाडू ठरला. त्याने नुकत्याच दक्षिण कोरियात या कामगिरीची नोंद केली.

अमरावतीची कांचनमाला चॅम्पियन
अमरावतीच्या कांचनमाला पांडे ह्या जन्मत:अंध आहेत. मात्र, अंधत्वावर मात करताना त्यांनी जलतरणात सोनेरी यश संपादन केले. पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये चॅम्पियन होण्याची मोहीम त्यांनी कायम ठेवली. फ्रीस्टाइल, बटरफ्लायसारख्या प्रकारात त्यांनी वर्चस्व निर्माण केले. याशिवाय त्यांनी ११ व्या वर्षी अंध असूनही समुद्रात पोहण्याचा केलेला विक्रम लिम्का बुकमध्ये नोंद आहे.

नाशिकच्या प्रियंकाचा ‘चेकमेट’
घरात अठराविश्वे दारिद्र्य, आईवडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. याच घरात प्रियंकाने जन्म घेतला. जन्मत:च तिला अंधत्व आले. मात्र, या अंधत्वाला चेकमेट करून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाचा झेंडा रोवला. तिने बुद्धिबळात तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली नवीन ओेळख निर्माण केली. प्रतिभावंत प्रियंकाने ज्युदोमध्येही कर्तबगारी दाखवली.