मुंबई - आयपीएल २०१५ नंतर टी-२० वर्ल्डकप २०१६ च्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर हार्दिक पंड्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. आयपीएलमध्ये आणखी एक पंड्या असून तोसुद्धा आपली फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. हा पंड्या आणखी कोणी नसून हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्या आहे. या आयपीएलमध्ये पुणे रायझिंगविरुद्ध हार्दिकने ९ धावा काढल्या. दुसरीकडे कृणाल पुणे आणि केकेआर या दोन्ही सामन्यांत प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. मात्र, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सामन्यात कृणालला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
दोन भाऊ एकाच संघात : कृणाल आणि हार्दिक पंड्या दोघेही एकाच मुंबई इंडियन्स संघात सामील आहेत. हे दोघे सख्खे भाऊ असून एकाच आयपीएल संघाकडून खेळण्याची त्यांना संधी मिळाली आहे. याआधी इरफान आणि युसूफ पठाण आयपीएलमध्ये निश्चितपणे खेळले. मात्र, दोघेही वेगवेगळ्या संघांकडून सहभागी झाले. युसूफ-इरफान आयपीएलमध्ये एकाच संघाकडून अद्याप खेळू शकलेले नाहीत. आता हार्दिक आणि कृणाल एकाच वेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतात.
कोण आहे हा कृणाल पंड्या ? : कृणाल अष्टपैलू खेळाडू असून तो डावखुरा आक्रमक फलंदाज आणि डावखुरा फिरकीपटू आहे. त्याची गोलंदाजीसुद्धा उत्तम आहे. २५ वर्षीय कृणालने मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका देशांतर्गत सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने जव्हेरी प्रीमियर लीगमध्ये "रिलायन्स-११'साठी वायएएससी-११ विरुद्ध ३२७ चेंडूंत ३३६ धावा ठोकल्या होत्या. यात त्याने २१ षटकार आणि २६ चौकार मारले. याशिवाय दोन विकेटही घेतल्या होत्या. त्याला संधी मिळाली तर तोसुद्धा हार्दिकप्रमाणे सर्वांना आपल्या प्रदर्शनाने चकित करू शकतो.
कृणालवर २ कोटी
कृणाल पंड्या हार्दिकपेक्षा २० पट महागडा आहे. त्याला या वर्षी बोलीत २ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले, तर हार्दिकला २०१५ मध्ये अवघ्या १० लाखांत खरेदी करण्यात आले होते. हार्दिक आणि कृणालचे वडील हिमांशू स्वत: क्रिकेटपटू होते. त्यांनी बडोदा येथील किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीत दोन्ही भावंडांना क्रिकेटचे बाळकडू दिले. दोघेही बडोद्याकडून खेळतात. अाता पंड्या ब्रदर्स आयपीएलमध्ये धूम करण्यास तयार आहेत.