आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलचा ‘फॅन पार्क’चा नवा फंडा, १५ शहरांत मोठ्या स्क्रीनवर सामने दाखवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा थरार स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी भारतातील अन्य शहरांतील क्रिकेट रसिकांना मिळत नाही. तो योग जुळवून आणण्यासाठी बीसीसीआयने ‘सोनी मॅक्स’च्या साथीने भारतातील १५ शहरांमध्ये निवडक क्रिकेट सामन्यांचे मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी ‘फॅन पार्क’ची नवी कल्पना आखली आहे.
सात आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेच्या प्रत्येक आठवड्यातील दोन-दोन सामन्यांचे दोन तारखांना असे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी भोपाळ, अलाहाबाद, इंदूर, कानपूर, बेळगाव, उदयपूर, सुरत, वारंगळ, लुधियाना, गुंटूर, कोइम्बतूर, आग्रा, नागपूर या शहरांमध्ये ‘फॅन पार्क’ उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक शहरामध्ये १० हजारांवर क्रिकेट रसिक या सेवेचा विनामूल्य लाभ घेऊ शकतील. आयपीएलचे ८ संघ एकूण १२ शहरांमध्ये सामने खेळणार आहेत. त्या १२ शहरांना वगळून सध्या या १५ शहरांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे.
प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश विनामूल्य असेल. स्टेडियमसदृश वातावरण निर्माण करण्यात येणार असून, स्वत:च्या पैशाने खाद्यपदार्थांचा आस्वाद क्रिकेट रसिकांना घेता येईल, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. खान-पान सेवेसह डीजे, म्युझिक आणि दिव्यांची रोषणाई याच्यासह प्रत्यक्ष सामन्याच्या वातावरणाचा या ‘फॅन पार्क’मध्ये आभास निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक ‘फॅन पार्क’ क्रिकेट सामन्याला सुरुवात होण्याआधी २ ते ४ तास आधी खुले करण्यात येईल. या फॅन पार्कमध्ये महिलांसाठी व कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कक्षही राखून ठेवण्यात येणार आहेत.
कुटुंबीयांसाठी एकत्र येऊन मजा लुटण्यासाठीची ही संकल्पना यंदापासून बीसीसीआयने सुरू केली आहे. इतर शहरांमध्ये असे फॅन पार्क्स निर्माण करण्यात येतील, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.
पार्क्समधील कार्यक्रम
११ व १२ एप्रिल नागपूर व आग्रा
१८ व १९ एप्रिल कोइम्बतूर
२५ व २६ एप्रिल लुधियाना व गुंटूर
२ व ३ मे सुरत व वारंगल
९ ते १० मे उदयपूर, बेळगाव
१६ व १७ मे कानपूर व इंदूर

बाद फेरीचा पहिला पात्रता सामना अलाहाबादला १९ मे रोजी दाखवण्यात येईल, तर भोपाळ येथील दुसरा पात्रता सामना २२ मे रोजी फॅन पार्कचे आयोजन करून दाखवण्यात येईल.