नवी दिल्ली- आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटर एस. श्रीसंतसह अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने शनिवारी हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण उजेडात आले तेव्हा तिनही खेळाडू राजस्थान रॉयल्स टीमचे सदस्य होते. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांनाही या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते. न्यायालयाने त्यांनाही दोषमुक्त ठरवले आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकारणात न्यायालयाने एकूण 36 जणांना निर्दोष सोडले आहे. मात्र बीसीसीआयने श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांच्यावरील बंदी हटवली नाही. या दोन्ही खेळाडूंवर सप्टेंबर 2013 पासून मंडळाने क्रिकेटपासून बंदी घातली आहे. आयपीएलच्या सहाव्या मोसमादरम्यान 2013 साली या तिघांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक झाली होती. दिल्ली पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेतले होते. अवघ्या क्रिकेट विश्वात खळबळ माजवणारी ही घटना होती.
कोर्टाने केली निर्दोष मुक्तता
कोर्टासमोर शनिवारी या तीनही खेळाडूंच्या विरोधात आरोप ठेवण्यात आले होते. दुपारी अडिच वाजेच्या सुमारास प्रॉसिक्यूशनने न्यायमूर्तींना पूरावे सादर करण्यासाठी अवधी मागितला. चार वाजता पुन्हा सुरू झालेल्या न्यायालयाच्या कामकाजात सबळ पुरावे न मिळाल्याने कोर्टाने या प्रकरणातील खेळाडूंना दोषमुक्त ठरवले आहे.
निकाल ऐकून श्रीसंत रडला
आपण दोषमुक्त असल्याचा निर्णय ऐकताच श्रीसंतला रडू कोसळले. नंतर माध्यमांसमोर तो म्हणाला, '' मी कोणता गुन्हाच केला नव्हता त्यामुळे एक ना एक दिवस मी निर्दोष सुटलो असतोच. आता मी आपले सामान्य जिवन जगू शकेल.'' न्यायालयाबाहेर पत्रकारांशी तो बोलला, '' मी देवाचा आभारी आहे. मला पुन्हा ट्रेनिंग सुरू करायचे आहे. बीसीसीआय मला त्यासाठी परवानगी देईल असा विश्वास वाटतो.''
जामिनावर होते क्रिकेटर
यातील तीन आरोपी क्रिकेटर्सना पुराव्यांअभावी जामीनावर सोडण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी 42 लोकांना आरोपी बनवले होते. ज्यामध्ये 6 जण फरार होते. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला आहे.
दाऊद आणि छोटा शकीलही होता आरोपी
या प्रकरणात दाऊद आणि छोटा शकीलसह सहा जण फरार घोषित होते. फिक्सिंग आणि सट्टेबाजीवर दाऊद व शकीलचे कंट्रोल असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. पाेलिसांनी या प्रकरणात दाऊद आणि शकील यांच्यासह पाकिस्तानी जावेद चटनी, सलमान उर्फ मास्टर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
एका षटकात जाणीवपूर्वक 14 धावा दिल्याचा आरोप
आयपीएल-6 मध्ये श्रीसंत आणि इतर खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते. 9 मे, 2013 ला पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये राजस्थानचा खेळाडू श्रीसंत याने ठरलेल्या प्लॅननुसार संकेत देऊन एका षटकात कमीत कमी 14 धावा दिल्याच्या आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.