आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार पुन्हा आयसीसीचे अध्यक्ष?, ४ ऑक्टोबरला बीसीसीआय अध्यक्षाची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बीसीसीआय अध्यक्षांच्या रिक्त खुर्चीत, येत्या रविवारच्या मुंबईतील आपत्कालीन बैठकीत (विशेष सर्वसाधारण सभा) शशांक मनोहर यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जाते. मात्र बीसीसीआयच्या राजकारणाची सूत्रे फिरविण्यात वाकबगार असलेले शरद पवार यांची नेमकी भूमिका काय याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची कदाचित आयसीसीच्या अध्यक्षपदावर पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे.
याचे मुख्य कारण स्वत: एन. श्रीनिवासन हेच आहेत. न्यायालयाच्या मतांचा अनेकदा आदर राखताना गफलती करणाऱ्या श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे आयसीसीवरील प्रतिनिधी म्हणून यापुढे संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच श्रीनिवासन यांनी शरद पवार यांना नागपुरात अचानक भेटून आपली अनुकूलता व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
त्याच वेळी नागपूरकर शशांक मनोहर शहरात नव्हते. दोन दिवसांतच अरुण जेटली, अजय शिर्के व शशांक मनोहर यांची दिल्लीत झालेली भेट मात्र बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत कोण बसणार ही गोष्ट स्पष्ट करणारी होती.

दालमियांप्रमाणेच ‘तडजोड प्रस्ताव’ म्हणून जेटली या वेळी शशांक मनोहर यांना पाठिंबा देऊ शकतात, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. शशांक मनोहर आणि शरद पवार यांचे एकमत आहे. यामुळे पुढे शरद पवार यांच्यासारखा महत्त्वाकांक्षी, चाणाक्ष माणूस आयसीसीवर गेला तर भारतासाठी अनेक गोष्टी लाभदायक ठरू शकतील, असे बीसीसीआयमधील एका गटाचे मत आहे.

श्रीनिवासन यांचा मार्ग खडतर !
श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयानेच जर बीसीसीआयवरील कामकाजातील हस्तक्षेपासंदर्भात यापुढेही रोखले तर त्यांना भारताचे आयसीसीवरील प्रतिनिधित्व करणे कठीण जाणार आहे. अशा परिस्थितीत शरद पवार या अनुभवी क्रिकेट प्रशासकाचा पुन्हा एकदा बीसीसीआयवर विचार करण्याची शक्यता आहे. आयपीएलचे जनक ललित मोदी यांच्या जागतिक स्तरावरील क्रिकेट योजनाही आयसीसीने (श्रीनिवासनमुळे) सध्या बासनात गुंडाळून ठेवल्या आहेत. श्रीनिवासन यांची तेथून गच्छंती झाल्यास कदाचित मोदी यांच्या अमेरिकन क्रिकेट लीगसारख्या कल्पनांना आयसीसीच्या आशीर्वादाने पुन्हा अंकुर फुटू शकतील. गेल्या ४ ऑक्टोबरपासून भारतीय आणि जागतिक क्रिकेट पुन्हा एकदा नव्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.