आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळपट्टी चांगलीच; आफ्रिकन सुमार खेळले, व्‍हीव्‍हीएस लक्ष्मणचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खेळपट्टीचा वाद विनाकारण रंगत आहे. भारताच्या खेळपट्या चांगल्याच आहेत. कसोटी मालिकेत उपयोगात आलेल्या खेळपट्या चांगल्याच होत्या. द.आफ्रिका उगीच कांगवा करीत आहे. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आफ्रिकन खेळाडू नीट खेळले नाही. त्यांनी मुळीच संघर्ष केला नाही. अखेरच्या कसोटीत थोडा संघर्ष दिसला. उर्वरित मालिकेत त्यांचे तंत्र आणि कामगिरी सुमार दर्जाची होती. तसेच भारतीय फिरकी गोलंदाजी खूप दर्जेदार होती, असे मत भारताचा शैलीदार फलंदाज व्ही.व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केले. लक्ष्मण क्रिकेट स्पर्धेच्या उद््घाटनानिमित्त औरंगाबादेत आला असता त्याने पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्याने खेळपट्टीबाबत मत व्यक्त केले.

अाफ्रिकेचा डिव्हिलर्स ग्रेट
दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला आणि ए.बी.डिव्हिलर्सने चिवट खेळ करून कसोटीचे तंत्र युवा खेळाडूंना दाखवून दिले. डिव्हिलर्स आक्रमक खेळाडू आहे, तरीदेखील त्याने २९७ चेंडूंत ४३ धावा करून आपल्या आक्रमतेला मुरड घातली. त्याची ही खेळी काैतुकास्पद अाहे. झटपट क्रिकेटच्या जमान्यात कसोटीतदेखील प्रतिभावंत युवा खेळाडू भारतीय संघामध्ये तयार होतात, हे पाहून आनंद वाटला.

पाकिस्तानने टी-२० वर्ल्डकप खेळावा
भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिका अायाेजनाचा निर्णय केंद्र सरकार घेईल. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, भारतात २०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने खेळायला हवे, असे मला वाटते.

युवा खेळाडू प्रतिभावान
भारताचा युवा संघ दमदार कामगिरी करत असून संघातून दिग्गज खेळाडू बाहेर झाल्यानंतर आता संघ पुनर्बांधणीतून जात आहे. भारताच्या युवा संघात मोठी क्षमता आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सुरक्षीत आहे. लवकरच भारत कसोटी क्रमवारीत नंबर वन होईल.

अजिंक्य रहाणेची उत्कृष्ट खेळी
दिल्ली कसोटीत भारतीय संघाचा युवा फलंदाज अजिंक्य रहाणेने दोन्ही डावांत शतक झळकावत उत्कृष्ट प्रदर्शन केले. तो परिपक्वतेकडे जात आहे. त्याने मोक्याच्या क्षणी भारताला संकटातून वाचवले आणि त्याची खेळी अविस्मरणीय आहे. त्यामुळे भारताला विजय निश्चित करता अाला. या खेळीमुळे भारताला क्रमवारीत दुसरे स्थानही गाठता अाले.
करिअरवर लक्ष देण्याचा सल्ला
लक्ष्मणने युवा खेळाडूंना खेळाबरोबर आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. प्रत्येक खेळाडू भारताकडून खेळू शकत नाही. वयाच्या २० व्या वर्षी करिअरसाठी निर्णय घ्यायला हवा. भविष्यात विविध क्षेत्रांत भरपूर संधी असल्याने अभ्यासाकडेदेखील दुर्लक्ष करू नका. मेहनतीमध्ये कमी पडू नका आणि प्रामाणिक प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. चांगले खेळाडू नाही बनलात, तरी चांगली व्यक्ती बना.
विजय, शिखर, रोहित चांगले खेळाडू
सध्या बॅडपॅचमध्ये असलेले मुरली विजय, रोहित शर्मा, शिखर धवन हे उत्कृष्ट फलंदाज आहेत. प्रत्येकाची आपापली खासियत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळण्याची त्यांच्यात क्षमता असून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात याच फलंदाजीची चुणूक त्यांनी दाखवली आहे. सध्या या खेळाडूंचा फॉर्म नसला तरीही त्यांना लगेच संघाबाहेर करणे योग्य नाही. त्यांना संधी आणि वेळ दिला पाहिजे.