आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० विश्वचषक : भारत-पाक झुंजणार, ईडन गार्डनवर आज सामना रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसीच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची मिनी फायनल रंगणार आहे. शनिवारी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले. आशिया चषकात पाकविरुद्ध मिळवलेल्या विजयाची लय कायम ठेवण्याचा यजमान भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाक टीम सज्ज आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये काट्याची लढत रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगभरातील चाहत्यांची या सामन्यावर नजर लागली आहे. यातील निकालाबाबतची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सुरक्षेसाठी ईडन गार्डनवर चाेख बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.

सलामीचा सामना गमावल्यामुळे भारतीय संघ स्पर्धेत विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक अाहे. पाकिस्तान स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपध्ये सहा वेळा व टी-२० वर्ल्डकपमध्ये चार वेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे. याला उजाळा देण्याचा भारताचा प्रयत्न असेल

कोहली, रोहितवर मदार
भारतीय संघाच्या विजयाची मदार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवनवर असेल. मधल्या फळीतले युवराजसिंग, सुरेश रैना आणि जगातील अव्वल फिनिशर धोनीच्या उपस्थितीत टीमची फलंदाजी मजबूत आहे. गोलंदाजीतही बुमराहसह अश्विनकडून दमदार कामगिरीची आशा आहे.

ईडन गार्डन पाकसाठी लकी
काेलकात्यातील ईडन गार्डन हे आतापर्यंत पाकिस्तान टीमसाठी लकी ठरले आहे. या टीमने या मैदानावर भारतविरुद्ध झालेल्या चारही सामन्यांत विजयी पताका फडकावली आहे. यात १९८७, १९८९, २००४ आणि २०१३ मधील सामन्यांचा समावेश आहे.
संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धेनी (कर्णधार), आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, शिखर धवन, हरभजनसिंग, रवींद्र जडेजा, विराट कोहली, मो. शमी, पवन नेगी, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रोहित शर्मा, युवराजसिंग.

पाकिस्तान : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), मो. हाफिज, शोएब मलिक, शर्जिल खान, वहाब रियाझ, मो. नवाझ, खलीद लतीफ, आमेर, उमर अकमल, सरफराज अहमद, वसीम, अन्वर अली, खुर्रम मंझूर.
अमिताभ-शफाकत गाणार राष्ट्रगीत
भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन, पाकचा गायक शफाकत अमानत आपापल्या देशाचे राष्ट्रगीत गाणार अाहे. त्यानंतर सामन्याला सुरुवात हाेईल.
भारतीय महिलांसमोर आज पाक
नवी दिली - सलामीच्या विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय महिला संघ विश्वचषकात दुसरा सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहे. आता भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये शनिवारी सामना रंगणार आहे. हे दोन्ही संघ नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर समोरासमोर असतील. भारतीय महिला टीमने सलामीचा सामना जिंकून विश्वचषकातील आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. महिला टीमने सलामीला बांगलादेशवर ७२ धावांनी मात केली होती. आता मितालीच्या नेतृत्वाखाली दुसरा सामना जिंकण्याचा यजमान भारतीय महिला टीमचा प्रयत्न असेल.