आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandekar's Artical On Sachin Tendulkar

तो छोटा सचिन, हा महान सचिन !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये 1992 च्या फेब्रुवारी-मार्चदरम्यान झालेली बेन्सन अँड हेजेस विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अनेक कारणांमुळे क्रिकेटच्या भरगच्च इतिहासातसुद्धा वेगळे स्थान निर्माण करून गेली. पाकिस्तानने मेलबोर्नला झालेला अंतिम सामना इम्रान खानच्या विलक्षण नेतृत्वाखाली जिंकला होता आणि विश्वचषक पटकावून एक वेगळाच इतिहास लिहिला होता. मी प्रत्यक्ष मेलबोर्नच्या मैदानात त्या रात्री उपस्थित होतो आणि इम्रान खान किती गर्वाने तो चमकदार चषक डोक्यावर घेऊन नाचत होता याचा मी साक्षीदार होतो.
हा तोच विश्वचषक जो सचिनसाठी मर्यादित षटकांचा पहिला विश्वचषक होता. झटपट क्रिकेटचा जनक कॅरी पॅकरच्या ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच रंगीबेरंगी कपडे घालून क्रिकेट खेळण्याची सुरवात झाली. याच स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आपली वर्णभेद नीती विसरून पहिल्यांदा जगासमोर आपली क्रिकेटची ताकद दाखवत होता. अशी एक ना एक अनेक कारणे आहेत ज्यामुळे हा चषक किंवा ही स्पर्धा क्रिकेट चाहत्यांच्या आवर्जून लक्षात राहते. मला मात्र हा दौरा आठवतो तो सचिन तेंडुलकरमुळेच.
सचिन तेव्हा 19 वर्षांचा युवक होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसा ‘बच्चा’च. दोन-तीन वर्षे आधीच तो पाकिस्तानाला गेलेल्या 1989 च्या कसोटी चमूत सर्वात लहान खेळाडू ठरला होता. वय वर्षे 16 आणि वर 205 दिवस. कमी उंचीच्या या निरागस खेळाडूवर वासीम अक्रमने थेट चार बाऊन्सर्सनी एका पाठोपाठ हल्ला चढवल्याची गोष्ट माझ्या ध्यानात होती.
परंतु, पाकिस्तानच्या खेळपट्ट्या (विकेट्स) व ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांमध्ये खूपच वेगळेपणा होता. ही स्पर्धा मर्यादित षटकांची व वेगवान गोलंदाजांची होती. इथे लहानसा सचिन कसा खेळेल, त्याचा निकाल कसा लागेल याकडे जगाचे लक्ष लागून होते.
सचिन हा पुढे जाऊन मोठा, जगविख्यात फलंदाज होईल हे सांगणे जरी तेव्हा कठीण होते, तरी महत्त्वाची एक गोष्ट माझ्या ध्यानात आली होती. सचिन व त्याचा शाळकरी साथीदार विनोद कांबळीही भारतीय संघात होता व आम्हास या दोघांना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये फलंदाजी करताना बघण्याचा योग येणार होता.
अझरुद्दीन भारतीय संघाचा कर्णधार होता व कपिल देव त्याच्या हाताखाली खेळत होता. भारतीय चमूत सचिनसह पाच मराठी खेळाडू होते - संजय मांजरेकर, यष्टिरक्षक किरण मोरे, प्रवीण आमरे व विनोद कांबळी; परंतु जी गोष्ट डोळ्यात भरून राहिली व कालांतराने देशासमोर आली ती हीच की सचिन अत्यंत गंभीरपणे प्रत्येक सामना खेळत होता, बघत होता. जेव्हा तो फलंदाजी करत नसायचा तेव्हाही पूर्ण गांभीर्याने दुसरे कसे खेळतात याकडे लक्षपूर्वक बघत असायचा; परंतु कांबळी भारी अवखळ. बारावा खेळाडू असतानासुद्धा त्याचे खेळाकडे कमी व स्टेडियममध्ये अचकट-विचकट डान्स करणा-या व नव्यानेच क्रिकेटमध्ये स्थान मिळवू घातलेल्या ‘चीअर गर्ल्स’कडे जास्त लक्ष असायचे. तो कधीच गंभीर दिसला नाही. कांबळी व सचिन दोघांचे सामने, वागणे व क्रिकेटकडे पाहण्याचा एकूणच दृष्टिकोन किती वेगळा होता ते मला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या त्या दौ-यातच ठळकपणे ध्यानात आले होते. पुढे सचिनची फलंदाजी, त्याची शतकानंतर शतके व अत्यंत संयमित अशी वागणूक त्याला आज क्रिकेटचा देव म्हणून ओळख प्राप्त करून देत आहे; पण कांबळी आज कुठे आहे? आजच्या तरुणांना (होतकरू क्रिकेटपटू, खेळाडूंसह सर्व गटांतील तरुणवर्ग) ही तुलना खूप काही शिकवू शकते.
ज्या पाकिस्तानने तो विश्वचषक जिंकला त्याच्याविरुद्ध खेळताना सचिनने अर्धशतक (54 धावा) ठोकले आणि एक बळीही घेतला होता. न्यूझीलंडविरुद्ध 84 धावा फटकावल्या, तर झिम्बाब्वेविरुद्ध 81.याच दौ-यात मला सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या घरी अ‍ॅडलेडला काही क्षण भेटण्याचा सुवर्णयोग आला. माझ्यासोबत क्रिकेटवेडे संपादक प्रभाष जोशीदेखील होते. आम्ही दोघांनी त्यांना विचारले होते, ‘सचिनची बॅटिंग स्टाइल तुमच्यासारखी आहे असे अनेक जण म्हणतात...तुम्हाला काय वाटते? तुम्ही आज सामना बघायला स्टेडियमला याल असे वाटले होते, जेणेकरून तुम्ही सचिनला बघितले असते खेळताना.’ त्यावर ते म्हणाले होते, ‘मलाही यायची खूप इच्छा होती परंतु, माझी बायको खूप आजारी असल्याने मी घर सोडू शकत नव्हतो.’ अर्थातच तेव्हा छोट्या सचिनची आणि त्या क्रिकेट महर्षीची भेट होऊ शकली नाही. पुढे अनेक वर्षांनी स्वत: सचिन ब्रॅडमनला जाऊन भेटला व ती क्रिकेटची एक मोठी आणि सर्वांसाठी अविस्मरणीय अशी घटना म्हणून इतिहासात कोरली गेली. तेव्हा ब्रॅडमनने त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. ब्रॅडमनला जग सोडून आता दहा-बारा वर्षे झाली. सचिन आता क्रिकेटला रामराम करतोय आणि त्याच्या चाहत्यांना रडू फुटतेय.
क्रिकेटचा धु्रवतारा
पहिल्यांदा मी पाहिलेला ऑस्ट्रेलियातला लहान सचिन व आजचा सचिन खेळाडू या नात्याने खूप खूप मोठा आहे. परंतु, माणूस म्हणूनही तो खूप खूप महान झालेला आहे. क्रिकेट जगतातला हा नेहमीच चमकणारा ध्रुवतारा मराठी असल्याने प्रत्येक मराठी मन सध्या दुखावलेलेही आहे व दुसरीकडे अभिमानाने त्याचा उर भरून आलाय. दोनशे कसोटी खेळण्याचा जागतिक विक्रम व शंभर शतकांचा डोंगर केवळ त्याची प्रचंड मेहनत, संपूर्ण समर्पण, अतुलनीय गुणवत्ता व गांभीर्य याचमुळे शक्य झाले आहे. लाखो, करोडो चाहत्यांच्या या ‘देवाबद्दल’ लिहिताना मायबोलीचे हे शब्द किती तरी पटींनी अपुरे पडताहेत.
(लेखक ‘दिव्य मराठी’चे संपादकीय प्रमुख (महाराष्ट्र) व माजी क्रिकेट रिपोर्टर आहेत. इंग्रजी दैनिक फ्री प्रेस जर्नलसाठी त्यांनी अनेक क्रिकेट सामन्यांचे वार्तांकन केले आहे.)