आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhilash Khandeka's Artical On Sachin Tendulkar Practise Match

क्रिकेटच्या ‘पंढरी’त ‘देवा’चा सराव (अभिलाष खांडेकर)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील स्थानिक क्लब आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियात मतभेद झाल्यानंतर 1975 मध्ये दक्षिण मुंबईत वानखेडे स्टेडियम बांधण्यात आले. सचिन रमेश तेंडुलकरने या स्टेडियमवर असे काही चमत्कार घडवले की हे शहर क्रिकेटची पंढरी म्हणूनच ओळखले जाऊ लागले. सर्वत्र निवृत्तीची चर्चा सुरू असतानाच ‘देवाने’ मंगळवारी आणि बुधवारी कडक सुरक्षाव्यवस्थेत सामान्य खेळाडूप्रमाणे सराव केला. सचिनची एक झलक पाहता यावी आणि तिकीट विकत घेता यावे (ज्यांची आधीच विक्री संपली आहे) या आशेने हजारो सचिन समर्थकांनी मैदानावर गर्दी केली होती.
सारे जग सचिनच्या 200 व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याविषयी चर्चा करत असले, तरी सचिन मात्र नेट प्रॅक्टिस वेळी नेहमीप्रमाणेच शांत होता. प्रशंसकांकडून सचिन नावाचा जप होत असताना त्याचे लक्ष मात्र जमिनीवरच स्थिरावले होते. इकडे मैदानाच्या कडेला सचिनच्या नावे असलेल्या अनेक विक्रमांपैकी 69 विक्रम लिहिण्याचे काम सुरू होते जे उद्यापर्यंत सुरूच राहील. या विक्रमात कसोटीतील 15 हजारांपेक्षा जास्त धावा, एकदिवसीय सामन्यातील 18 हजार 426 धावा, 100 आंतरराष्टÑीय शतके आणि आता 200 कसोटी सामने इत्यादींचा समावेश आहे. अशाप्रकारे एखाद्या खेळाडूचा सन्मान होण्याची ही कोणत्याही देशातील क्रीडा विश्वातील एकमेव महान घटना आहे. गुरुवारपासून या मैदानावर भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे; परंतु येथे येणारा प्रत्येकजण येथील खेळ किंवा निकालाबाबत चिंतित नसून त्यांना येथे घडणा-या विक्रमांची काळजी आहे. दोन-दोन विश्वचषक जिंकणा-या दोन विश्वविजेत्या संघांदरम्यान खेळली जाणारी ही नव्वदावी कसोटी आहे. दोन कोटी लोकसंख्या असलेल्या शहरातील प्रत्येक मुंबईकर मैदानावर येऊन आपल्या लाडक्या महान क्रिकेटरला खेळताना बघू इच्छित होता; परंतु त्यांचे दुर्दैव... कारण या मैदानाची आसनक्षमता फक्त 32 हजार प्रेक्षकांइतकीच आहे. ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) किंवा शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)सारखे सर्व दिग्गज खेळाडू क्रिकेट पत्रकार आणि तज्ज्ञांसह सचिनचे पाच दिवसांचे पाहुणे म्हणून मोठ्या संख्येने मुंबईत क्रिकेटच्या देवाचा चमत्कार पाहण्यासाठी आलेले आहेत. सचिनच्या निरोपाचा सामना बघण्यासाठी मी रात्रभर जागणार असल्याचे जगातील अव्वल धावपटू युसेन बोल्ट याने सांगितले आहे. शिवाय संपूर्ण क्रीडाविश्वातून सचिनच्या निवृत्तीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. काल संध्याकाळी येथे आयोजित एका कार्यक्रमात ब्रायन लारा म्हणाला की, जर मला क्रिकेट खेळणारा मुलगा झाला, तर मी त्याला सांगेन की, तू तुझ्या वडिलांचे (लाराचे) व्हिडिओ पाहण्याऐवजी सचिन फलंदाजी करतानाचे व्हिडिओ बघ.
दरम्यान, कोलकात्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत सचिन लवकर बाद झाल्याने त्याचे कोट्यवधी चाहते नाराज झाले. आता दुस-या कसोटीत त्याच्याकडून एका असामान्य खेळीची आशा व्यक्त केली जात आहे. वानखेडेवरील पिचवर हिरवळ असून ती टणक आहे. ही पिच फलंदाजीस पोषक व्हावी यासाठी माजी भारतीय खेळाडू आणि क्युरेटर सुधीर नाईक यांनी प्रचंड घाम गाळला आहे. सचिनच्या 200 व्या सामन्याचे साक्षीदार म्हणून सचिनची आई रजनी तेंडुलकर मुलगा अजित, नितीन आणि मुलगी सवितासह मैदानावर येतील, अशी आयोजकांना आशा आहे.
व्हीलचेअरवरून येणा-या सचिनच्या आईसाठी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सचिनला निरोप देण्यासाठी प्रकृती चांगली नसली, तरी सचिनचे गुरू रमाकांत आचरेकरही मैदानावर उपस्थित राहतील अशी आशा आहे. सचिनचे वडील हयात नाहीत. 1999 च्या विश्वचषकादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी सचिन इंग्लंडमधून परतला होता आणि दुस-या दिवशी लगेचच परतून त्याने शतक ठोकले होते. सचिनच्या निवृत्तीमुळे मुंबईत भावनाविवश वातावरण तयार झाले आणि प्रत्येक मुंबईकराच्या ओठांवर नुसते त्याचेच नाव आहे. मुंबईकरांनी इतके प्रेम आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांनाच दिले होते आणि आता सचिनही त्याच पंक्तीत जाऊन बसला आहे. या तीन वेगळ्या व्यक्तिमत्त्वांची जगातील कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.