आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Acharya Training Need In Maharashtra Olympic Rahul Baneerji

महाराष्‍ट्रात तिरंदाजी अकादमीची गरज- ऑलिम्पिकपटू राहुल बॅनर्जी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्‍ट्रात तिरंदाजीला खूप वाव आहे. येथे अद्ययावत सुविधांसह तिरंदाजीची अकादमी सुरू केल्याने मोठे खेळाडू तयार होतील, असा विश्वास भारताचा युवा तिरंदाज आणि ऑलिम्पिकपटू राहुल बॅनर्जीने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.


आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धेसाठी भारतीय तिरंदाजी संघात पुनरागमन करण्यासाठी मी सज्ज आहे, असेही या वेळी त्याने नमूद केले. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे आयोजित राष्‍ट्रीय तिरंदाजी रँकिंग स्पर्धेसाठी तो शहरात आला आहे.


मागील दोन वर्ल्डकप स्पर्धेत मी भारतीय संघात नव्हतो. आता चांगला सराव झालेला असून फॉर्मदेखील परत आला आहे. त्यामुळे संघात परतण्याच्या आशा वाढल्या आहेत. माझे मुख्य लक्ष्य पुढील ऑलिम्पिक स्पर्धा आहे. मात्र, तत्पूर्वी तुर्की येथे होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिप व आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे राहुल म्हणाला. तसेच बुधवारपासून विदेशी प्रशिक्षक शिबिरात येत आहेत. त्यानंतर संघाचा अधिक चांगला सराव होईल, असेही तो म्हणाला. महाराष्‍ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गुणवंत खेळाडू आहेत. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. येथे जास्तीत जास्त अकादमी स्थापन झाल्या पाहिजे. तरच चांगले खेळाडू घडतील. यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा. असे झाल्यास भविष्यात महाराष्‍ट्रातून सर्वाधिक आंतरराष्‍ट्रीय खेळाडू घडतील, असे राहुल बॅनर्जीने स्पष्ट केले.


औरंगाबाद साई उत्कृष्ट
औरंगाबाद साईत पहिल्यांदाच आलो. येथील परिसर आणि व्यवस्था पाहून खूप चांगले वाटले. येथे सर्व व्यवस्था
उत्तम आणि सर्व चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत.


खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल
तिरंदाजी हा महागडा खेळ आहे, असे म्हणत त्याच्याकडे पाठ फिरवू नका. प्रथम इंडियन प्रकाराच्या खेळात उतरा आणि वाटचाल करा. यश आपोआप तुम्हाला मिळत जाईल. क्रीडा कोटातून सहज नोकरी मिळते. स्वत:चे प्रशिक्षण केंद्र उघडू शकतात आणि शाळा-महाविद्यालय आहेत. त्यामुळे खेळाडूचे भविष्य सुरक्षित आहे. खेळात नुकसान होत नसल्याने युवकांनी खेळाकडे वळले पाहिजे.