आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 20 Years Maharashtra Entered Final In Ranji Trophy

वीस वर्षांनंतर महाराष्‍ट्राची रणजी उपांत्य फेरीमध्ये धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - अंकित बावणे आणि संग्राम अतितकरच्या शानदार फलंदाजीनंतर समद फल्लाह, अनुपम संकलेचा आणि डॉमिनिक जोसेफ यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर महाराष्‍ट्राने रणजी करंडकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात महाराष्‍ट्राने प. बंगालवर 10 गड्यांनी दणदणीत मात करीत 20 वर्षांनंतर फायनल प्रवेश केला. वृद्धिमान साहाने (108) नाबाद शतक ठोकले. मात्र, या शतकानेसुद्धा बंगालला पराभव टाळता आला नाही. महाराष्‍ट्राने यापूर्वी 1970-71, 1992-93 मध्ये फायनल प्रवेश केला होता. त्या वेळी अनुक्रमे मुंबई आणि पंजाबकडून महाराष्‍ट्राचा पराभव झाला. 1939-40 आणि 1940-41 मध्ये महाराष्‍ट्राने रणजीचे विजेतेपद मिळवले होते.
गोलंदाज चमकले
पहिल्या डावात समद फल्लाहने सात विकेट घेऊन बंगालचा धुव्वा उडवला. नंतर अंकित बावणे आणि संग्राम अतितकरच्या तुफानी फलंदाजीने महाराष्‍ट्राने धावांचा डोंगर उभा केला. महाराष्‍ट्राने 341 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात वृद्धिमान साहाच्या नाबाद 108 धावांच्या बळावर बंगालने डावाने पराभव टाळला. मात्र, महाराष्‍ट्राचे तीन गोलंदाज फल्लाह, संकलेचा आणि जोसेफ यांनी प्रत्येकी तीन विकेट घेऊन बंगालला 348 धावांवर रोखले. विजयासाठी 8 धावांचे लक्ष्य महाराष्‍ट्राने एकही विकेट न गमावता सहजपणे गाठले. महाराष्‍ट्राच्या वाघांनी 10 गड्यांनी दणदणीत विजय मिळवत फायनल प्रवेश केला.
साहाने पराभव टाळला
होळकर स्टेडियमवर तिस-या दिवशी बंगालने 1 बाद 16 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. स्कोअर 34 धावांवर पोहोचला त्या वेळी अनुपम संकलेचाने अभिमन्यू इस्वरनला (6) पायचीत केले. 86 च्या स्कोअरवर संकलेचाने अरिंदम दासला (34) दरेकरकरवी झेलबाद केले. जेवणाच्या ब्रेकपर्यंत 3 बाद 116 असा स्कोअर झाला होता. लंचनंतर फल्लाहने सुदीप चटर्जीला (49) बाद केले. एका टोकाने एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने साहा खंबीरपणे झुंज देत होता. त्याने नाबाद 108 धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक : बंगाल पहिला डाव 114. महाराष्‍ट्र पहिला डाव 455. बंगाल दुसरा डाव 348. (वृद्धिमान साहा नाबाद 108, 3/110 फल्लाह, 3/83 संकलेचा, 3/80 जोसेफ), महाराष्‍ट्र बिनबाद 8. (हर्षद खडीवाले नाबाद 8, चिराग खुराणा नाबाद 0).