१४ फेब्रुवारी रोजी विश्वचषक क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने न्यूझीलंड येथील क्राइस्ट चर्चचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०११ मध्ये या शहराला भूकंपाचे जबरदस्त धक्के बसले होते. शहरच उद्ध्वस्त झाले होते. १८३ लोकांचा यात मृत्यू झाला होता. अब्जावधींचे रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, क्राइस्ट चर्चचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. पूर्वीपेक्षाही नव्या चर्चची इमारत शानदार आहे. तीनच वर्षांपूर्वी येथे केवळ भग्नावशेष होते, यास आता पाहिल्यावर विश्वासच बसणार नाही. येथील लोकांचे मनोबल इतके दांडगे आहे की केवळ तीन वर्षांपूर्वीच्या नैसर्गिक
आपत्तीच्या कहाण्याच येथे शिल्लक आहेत. पुरावे नाही. तीन वर्षांत ज्या व्यक्तीने हे संकट भोगले व त्याच्याशी मुकाबला केला, त्याच व्यक्तीने या कायापालटाची कथा सांगितली.
ही व्यक्ती म्हणजे महान ऑलराउंडर रिचर्ड हेडलींनीच या शहराच्या पुनर्निर्माणाची कथा सांगितली. १८ नोव्हेंबर रोजी हॅगली ओवल मैदानावर यांच्याशी बातचीत झाली. हेडलींचे हे जन्मगाव आहे. १४ फेब्रुवारी २०१५ मध्ये या मैदानावर वर्ल्डकप क्रिकेटचा पहिला सामना न्यूझीलंड व श्रीलंकेमध्ये होणार आहे. हेडली म्हणतात, ‘मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा जो वेग या शहरात दिसला, तो जगात कोठेही दिसला नसेल. "अमेरिकेच्या अर्बन सर्च अँड रेस्क्यू दलाने याला सर्वोत्कृष्ट आपत्ती निवारण म्हणून गौरवले आहे. भूकंपाच्या २ तासांच्या आत आपत्ती निवारण यंत्रणा सक्रिय झाली होती. मंत्र्यांना आपत्ती निवारण कार्यात सहभाग घेण्यास सांगण्यात आले होते. शहराचे महापौर बॉब पार्कर जखमी असूनही बचाव कार्यात सहभागी झाले होते.
पाच दिवसांत ८२ टक्के घरांमध्ये वीजपुरवठा सुरू झाला. शहराच्या पुनर्वसनासाठी १९२० अब्ज रुपये खर्च आला. भूकंपाच्या धक्क्याने येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान लेस्टर पार्कही उद्ध्वस्त झाले होते. त्यांच्या कुटुंबाच्या नावाने असलेले हेडली पॅव्हेलियन जमीनदोस्त झाले होते. याच मैदानावर त्यांचे वडील वॉल्टर हेडली, भाऊ डेल, बॅरी व त्यांनी स्वत: क्रिकेटचे धडे गिरवले होते.