भारतीय महिला हॉकी संघाने शानदार कामगिरी करताना बुधवारी जपानला २-१ ने पराभूत करून इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. तब्बल आठ वर्षांच्या अंतराने भारताला एशियाडमध्ये महिला हॉकीत पदक मिळाले आहे.
चार वर्षांपूर्वी भारतीय महिला हॉकी संघाचा जपानकडून १-० ने पराभव झाला होता. त्या वेळी भारतीय महिला संघ चौथ्या स्थानी होता. मागच्या पराभवाचा हिशेब या वेळी भारतीय महिलांनी चुकता केला. भारताने १९९८ च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. त्यापूर्वी १९८६ च्या सेऊल ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि
आपल्या यजमानपदाखाली १९८२ मध्ये भारताने सुवर्ण जिंकले होते. भारताने दुस-या आणि तिस-या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल केला. जपानकडून एकमेव गोल तिस-या क्वार्टरमध्ये झाला.
जसप्रीत कौरने २३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी पहिला गोल केला. योगायोग म्हणजे २३ क्रमांकाची जर्सी घालणा-या जसप्रीतने सामन्याच्या २३ व्या मिनिटालाच गोल केला. बरोबरीचा गोल करण्यासाठी जपानने भारतावर हल्ले वाढवले. अखेर त्यांना ४१ व्या मिनिटाला यश मिळाले. जपानच्या अकाने शिबाताने ४१ व्या मिनिटाला मैदानी गोल करून जपानला १-१ अशी बरोबरी करून दिली. पुढच्याच मिनिटाला भारताकडून वंदना कटारियाने मिळालेल्या संधीचे सोने करताना भारतासाठी दुसरा गोल केला. भारतीय खेळाडूंच्या एका मूव्हवर वंदनाला चेंडू मिळाला. तिने संधी न दवडता पहिल्याच प्रयत्नात शानदार गोल केला. हाच गोल निर्णायक ठरला.