ग्रेनोबल - भन्नाट वेगाचा बादशहा तसेच सात वेळा फॉर्म्युला-वन चॅम्पियन कार ड्रायव्हर मायकेल शूमाकर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. फ्रान्समध्ये रविवारी आल्प्स पर्वतररांगेत स्किइंग करताना खडकावर आपटून शूमाकरच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो कोमामध्ये गेला आहे.
अपघातानंतर 44 वर्षीय शूमाकरला रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्यावर तत्काळ न्यूरो सर्जरी करण्यात आली. मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ग्रेनोबलच्या सरकारी रुग्णालयातील आयसीयू विभागप्रमुख जीन फ्रान्सियोस यांनी सांगितले की, शूमाकरची प्रकृती खालावली असून तो कोमामध्ये गेला आहे.
शूमाकर रविवारी आपल्या 14 वर्षीय मुलासह बर्फावर स्कीईंग करत होता. सरकारी अधिकार्यांनी सांगितले की, शूमाकरने हेल्मेट घातलेले असून एका खडकावर तो आदळला. या अपघातानंतरही तो शुद्धीत होता. तत्काळ त्याला हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले होते.