भोपाळ - भारताचा माजी क्रिकेट कर्णधार अजय जडेजाच्या हस्ते येथे आरकेडीएफ विद्यापीठ मैदानावर क्रीडा महोत्सव संग्राम २०१४ चा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी अजय जडेजाने भास्कर समूहाच्या प्रतिनिधीशी
टीम इंडियाशी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली.
प्र. वर्ल्डकपला ४ महिने शिल्लक आहेत. टीम इंडियाची तयारी कशी आहे? जेतेपद कायम राहील काय?
जडेजा : चार महिन्यांचा कालावधी तसा खूप आहे. या चार महिन्यांत कोण संघात असेल, कोण नसेल हे सांगणे कठीण आहे. मागच्या वर्ल्डकप विजेता संघातील फक्त दोन ते तीन खेळाडू सध्या संघात आहेत. यामुळे आताच काही सांगणे कठीण आहे. सध्या कर्णधार आणि निवड समितीमध्ये ओढाताण सुरू आहे. निवड समिती ज्या खेळाडूंची निवड करते त्या खेळाडूंना धोनी संधीच देत नाही. ईश्वर पांडेचे उदाहरण ताजेच आहे. त्याला दौ-यावर पाठवण्यात आले व टुरिस्ट म्हणून फिरवून आणले. संधी दिली नाही.
प्र. तुमच्या मते वर्ल्डकपचा संघ कसा असला पाहिजे?
जडेजा : माझ्या मते, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, हरभजनसिंग, आशिष नेहरा,
गौतम गंभीरसारखे सीनियर खेळाडू संघात हवेत. घरात वरिष्ठ मंडळी असेल तर अर्ध्याच्या वर अडचणी अशाच दूर होतात, असे म्हटले जाते. त्याप्रमाणे आगामी वर्ल्डकपसाठी या चार-पाच खेळाडूंपैकी किमान दोन ते तीन खेळाडू संघात हवेत. रोहित शर्मा सध्या जखमी आहे. दुर्दैवाने संघातील एखादा सलामीवीर आणखी जखमी झाला तर
आपण अडचणीत येऊ. यामुळे वीरेंद्र सेहवागचा आतापासून उपयोग केला पाहिजे.