आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस: योकोविक-राफेल नदाल यांच्यात रंगणार अंत‍िम सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - यंदाच्या सत्रातील शेवटची ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा नोवाक योकोविक आणि राफेल नदाल यांच्या अंतिम सामन्यानंतर समाप्त होईल. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी फायनलमधील प्रवेश निश्चित केला. जगातील नंबर वन योकोविकने उपांत्य सामन्यात स्विस स्टार वावरिंकाचे आव्हान संपुष्टात आणले. यासह त्याने सलग चौथ्या वर्षी अमेरिकन ओपनची फायनल गाठली. दुसरीकडे स्पेनच्या राफेल नदालने फ्रान्सच्या रिचर्ड गास्केला पराभूत केले.

अव्वल मानांकित योकोविकने सेमीफायनलमध्ये नवव्या मानांकित वावरिंकाला 2-6, 7-6, 3-6, 6-3, 6-4 अशा फरकाने हरवले. तब्बल चार तास 10 मिनिटे हा सामना रंगला. मात्र, या मॅरेथॉन लढतीत सर्बियाच्या खेळाडूने बाजी मारली. दरम्यान, रोमांचक सामन्यातील पराभवानंतर वावरिंकाने रॅकेट तोडून आपला संताप व्यक्त केला. या वेळी झालेल्या दुखापतीमुळे त्याने मेडिकल टाइमआऊटही घेतला.

नदालचा सोपा विजय : स्पेनच्या राफेल नदालने सरळ तीन सेटमध्ये उपांत्य सामना जिंकला. त्याने आठव्या मानांकित गॉस्केला 6-4, 7-6, 6-3 अशा फरकाने धुळ चारली.

लावाकोवा-रादेकला किताब
चेक गणराज्यची आंद्रिया लावकोवा व लुसी रादेकने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचा किताब पटकावला. या जोडीने फायनलमध्ये एशलेग बार्टी-कॅसी डेलाकुआ या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा 6-7, 6-1, 6-4 ने पराभव केला. चेक गणराज्यच्या आंद्रिया लावकोवा व लुसी रादेक जोडीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम ठरले.


37 वेळा समोरासमोर
चार वर्षांत योगायोगाने तिसर्‍यांदा नदाल व योकोविक अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये समोरासमोर येत आहेत. 2010 मध्ये नदालने बाजी मारली होती. 2011 मध्ये योकोविक चॅम्पियन ठरला. एटीपी करिअरमध्ये योकोविक व नदाल हे 37 वेळा समोरासमोर आले आहेत. नदालने 25 वेळा विजय मिळवला. तर योकोविकला 11 विजय मिळवता आले.