आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मियामी ओपन टेनिस : योकोविक, मरे यांच्यात रंगणार फायनलची झुंज !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी - गतविजेता तसेच वर्ल्ड नंबर वन नोवाक योकोविक आणि इंग्लंडच्या अँडी मरे यांनी आपापले सेमीफायनलचे सामने जिंकून मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. योकोविक-मरे या दोन्ही स्टार खेळाडूंत रविवारी फायनलचा सामना रंगेल.
योकोविकला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अमेरिकेच्या जॉन इस्नरच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. त्याने हा सामना ७-६, ६-२ ने जिंकला. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये तिसऱ्या मानांकित मरेने शानदार आणि संतुलित खेळाचे प्रदर्शन करताना चेक गणराज्यच्या थॉमस बर्डिकला ६-४, ६-४ ने हरवले.

२५ वेळा समोरासमोर

दोन्ही खेळाडूंदरम्यान आतापर्यंत एकूण २५ वेळा सामने झाले. यात योकोविकने १७ वेळा आणि मरेने ८ सामने जिंकले. मियामी ओपनमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एकेक सामने जिंकले. २००९ आणि २०१३ मध्ये मियामी ओपनचा किताब जिंकणाऱ्या अँडी मरेला २०१२च्या फायनलमध्ये योकोविकनेच हरवले होते. या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने रविवारी मरे खेळेल. दुसरीकडे गतचॅम्पियन योकोविक पाचव्यांदा येथे किताब जिंकण्यासाठी मैदानावर उतरेल. हे दोन्ही खेळाडू सध्या भन्नाट फॉर्मात असून, हा फायनल सामना कोण जिंकेल, याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे.
सानिया मिर्झा-मार्टिना हिंगिस अंतिम फेरीत

भारताची सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगिसने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शानदार फॉर्मात असलेल्या या अव्वल मानांकित सानिया-हिंगिस जोडीने हंगेरीच्या टिमिया बाबोस आणि फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लादेनोविक जोडीला सरळ दोन सेटमध्ये ६-२, ६-४ ने पराभूत केले. आता त्यांचा सामना एकातेरिनी मकारोवा आणि अॅलेने वेस्निना या रशियन जोडीशी होईल.
अँडी मरे-बर्डिक सामना एकतर्फी

तत्पूर्वी मरेने कडक उन्हात सेमीफायनलचा सामना खेळताना बर्डिकला ६-४, ६-४ ने पराभूत करत फायनलमध्ये स्थान निश्चित केले. अँडी मरेने संपूर्ण सामन्यावर आपले वर्चस्व ठेवले. बर्डिकच्या छोट्या चुकांचा त्याने फायदा उचलत दोन्ही सेट जिंकले.
^इस्नर चांगला खेळत होता. अशा पद्धतीने सर्व्ह करणाऱ्या खेळाडूविरुद्ध खेळणे नेहमीच कठीण असते. अशा सामन्यांत धैर्य आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहून खेळणे महत्त्वाचे असते. मी तेच केले. - नोवाक योकोविक.

^मी गेले काही दिवस येथे चांगला खेळ केला आहे. मी येथील कोर्ट आणि परिस्थितीशी चांगला एकरूप झालो आहे. यामुळेच मी जिंकू शकलो. - अँडी मरे.