आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकशास्त्रज्ञाला ड्रेसिंग रूममध्ये नेल्याने बांगरला तंबी, किंग्ज पंजाबने अँटी करप्शन युनिटचा रोष ओढवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - किंग्ज पंजाबचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्या ओळखीतून आलेल्या या अंकशास्त्रतज्ज्ञाने थेट ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळवला. नेमकी हीच गोष्ट अँटी करप्शन युनिटच्या नजरेतून सुटली नाही. ड्रेसिंग रूममध्ये फक्त खेळाडूंनाच प्रवेश असतो. अशा वेळी अशा अागंतुकांचे तेथे काय काम, असा सवाल उपस्थित झाला आहे.

अँटी करप्शन युनिटने यासंदर्भात किंग्ज इलेव्हन पंजाबला ताकीद दिली असून हा अंकशास्त्रज्ञ पुन्हा तुमच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसता कामा नये, अशी तंबी पंजाब संघाला दिली आहे, अशी माहिती आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि फिजिओ, ट्रेनर्स यांची सेवा घेऊन आयपीएल स्पर्धेत उतरलेल्या फ्रँचायझींना त्यानंतरही येणारे अपयश सहन होत नाही. गत आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबची अशीच काहीशी अवस्था झाली आहे. आपल्या नव्या घरच्या मैदानावर पुण्यात (महाळुंगे) येथे पूजापाठ करूनही या संघाला यशाचे दर्शन काही होत नव्हते. शेवटी त्यांनी अंकशास्त्राचा आधार घेण्याचे ठरवले. या अंकशास्त्रज्ञामुळे त्यांच्या नशिबाचे फासे पलटवण्यास फारशी मदत झाली नाही. मात्र, या प्रयत्नात त्यांना आयपीएल अँटी करप्शन युनिटचा रोष पत्करावा लागला.
सदर घटनेबाबत बांगर यांनी आपल्याला काहीही ठाऊक नसल्याचे म्हटले. तीच भूमिका पंजाब संघाचे व्यवस्थापक वरुण परमार यांनी घेतली आहे. अँटी करप्शन युनिटची दृष्टी पंजाब संघाच्या यशासाठीच्या या धडपडीवर पडली आहे. पंजाब संघाचा एक खेळाडू म्हणाला, असे प्रयोग करण्याऐवजी समतोल संघ निवडला असता तर आम्ही अधिक सामने जिंकलो असतो. अंकशास्त्री कुणाला फळला ते निश्चित ठाऊक नाही, मात्र तो पंजाब संघाला ‘नडला’ एवढे मात्र निश्चित.

प्रवेश नसतोच
आम्हालाही खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. खेळाडूंची ती जागा आहे. आम्ही स्टेडियम भाड्याने दिल्यानंतर आमची बाकी जबाबदारीही संपते. आमचा या घटनेशी संबंध नाही.’
अजय शिर्के, एमसीए