आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankit Bavane, Vijay Zol Selected In Youth , Junior Team

अंकित बावणे, विजय झोलची ‘प्रगती एक्स्प्रेस’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बीसीसीआयने बुधवारी मराठवाड्याचे दोन युवा गुणवंत क्रिकेटपटू अंकित बावणे व विजय झोलची भारताच्या अनुक्रमे युवा व ज्युनिअर संघात निवड केली.


अंकित बावणे भारतीय युवा संघात
सिंगापूर येथे येत्या ऑगस्ट महिन्यात होणा-या एसीसी इमर्जिंग टीम कप स्पर्धेसाठी 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व मुंबईच्या सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. औरंगाबादचा अंकित बावणे याचादेखील या संघात समावेश करण्यात आला आहे. 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान सिंगापूरमध्ये या स्पर्धेचे सामने होतील. भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), के. एल. राहुल, कौस्तुभ पवार, अंकित बावणे, उन्मुक्तचंद, अशोक मणेरिया, मनप्रीत जुनेजा, समीत पटेल, प्रशांत चोप्रा, जसप्रीत भुमरा, संदीप वॉरियर, हर्षल पटेल, अक्षर पटेल, संदीप शर्मा, बी. अपराजित.


श्रीलंका दौ-यासाठी झोल कर्णधार
भारताचा 19 वर्षांखालील संघ जुलै व ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेच्या दौ-यावर जात असून भारताच्या युवक संघाचे नेतृत्व जालन्याच्या विजय झोलकडे सोपवण्यात आले आहे. या दौ-यात भारतीय संघ 4 दिवसांचे दोन, तर तीन वनडे खेळणार आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र संघ निवडण्यात आले असून दोन्ही संघांच्या नेतृत्वाची धुरा विजय झोलकडेच कायम ठेवण्यात आली आहे.


भारतीय संघ : विजय झोल (कर्णधार), संजू विश्वनाथ, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, महंमद सैफ, करण विरादिया, शुमराम खजुरिया, डी. निश्चल, अंकुश बैन्स, अतुल सिंग, पंजक जैस्वाल, अतित सेठ, सी.व्ही. मिलिंद, अमिर गनी, कुलदीप यादव.


भारतीय युवा संघाचा सलग चौथा विजय
डार्विन २ मध्यमगती गोलंदाज दीपक हुड्डाच्या (26 धावांत 3 विकेट) शानदार गोलंदाजीच्या बळावर आणि कर्णधार विजय झोलच्या नाबाद 46 धावांच्या बळावर भारताच्या 19 वर्षांखालील संघाने न्यूझीलंडला 7 गड्यांनी पराभूत केले. भारताचा हा सलग चौथा विजय ठरला आहे. फायनलमध्ये यापूर्वी स्थान मिळवणा-या भारताने न्यूझीलंडला स्पर्धेबाहेर केले. आता 12 जुलै रोजी यजमान ऑस्ट्रेलिया वि. भारत असा फायनलचा सामना होईल.


मेहनतीचे फळ मिळाले
अंकितची भारतीय संघात निवड झाल्याने खुप आनंदीत झालो. त्याने खूप मेहनत घेतली असून, याचे फळ त्याला संघ निवडीतून मिळाले आहे. त्याने फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि कामगिरीमध्ये सातत्य ठेवले. हे त्याच्या यशामागील कारण आहे.
रामदास बावणे, अंकितचे वडील


दोघांच्या निवडीने जल्लोष
विजयने कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याच्यातील गुणवत्ता दाखवून दिली. तो कधीही दडपणाखाली खेळला नाही. हा त्याच विशेष गुण आहे. अंकितमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. त्याला थोडी उशिरा संधी मिळाली. या दोघांमध्ये कमालीचे सातत्य आहे. दोघांचे अभिनंदन. संघात निवड झाल्याने ही जल्लोष करण्याची वेळ आहे.
प्रदीप देशमुख, विभागीय सचिव, एमसीए