आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकितचे बावनकशी शतक, हिमाचल प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राच्या 6 बाद 488 धावा; 260 धावांची आघाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र रणजी संघाला गरज असताना औरंगाबादचा तडफदार फलंदाज अंकित बावणेने दमदार शतक ठोकले. अंकितच्या नाबाद 138 धावांच्या बळावर क गटातील रणजी सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राने 5 बाद 488 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. हिमाचलने पहिल्या डावात सर्वबाद 228 धावा काढल्या होत्या. महाराष्ट्राने पहिल्या डावात 260 धावांची आघाडी घेतली. तिसर्‍या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी दिवसअखेर हिमाचलने दुसर्‍या डावात 1 बाद 98 धावा काढल्या होत्या.
हिमाचलकडून वरुण शर्मा 35 आणि पी. डोगरा 41 धावांवर खेळत होते. मंगळवारी सकाळी महाराष्ट्राने 4 बाद 319 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी अंकित बावणे 76 आणि चिराग खुराणा 37 धावांवर खेळत होते. संघाच्या धावफलकात अवघ्या 15 धावांची भर पडल्यानंतर चिराग खुराणाला (43) मलिकने चोप्राकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये परतवले.
अंकित-श्रीकांतची भागीदारी
यानंतर खेळण्यास आलेल्या श्रीकांत मुंढेने अंकित बावणेला चांगली साथ दिली. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 88 धावांची उपयुक्त भागीदारी केली. श्रीकांत मुंढेने 96 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 58 धावा ठोकल्या.
अंकितच्या चार अर्धशतकी भागीदार्‍या
एकेक गडी बाद होत असताना दुसर्‍या टोकाने अंकितने नाबाद 138 धावा ठोकल्या. अंकितने 304 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांसह ही खेळी केली. केदार जाधव बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या अंकितने तब्बल 304 मिनिटे झुंज दिली. अंकितने सुरुवातीला हर्षद खडीवालेसोबत चौथ्या गड्यासाठी 68 धावांची, नंतर चिराग खुराणासोबत पाचव्या विकेटसाठी 97 धावांची, श्रीकांत मुंढेसोबत सहाव्या विकेटसाठी 88 धावांची तर अक्षय दरेकरसोबत सातव्या विकेटसाठी अभेद्य 66 धावांची भागीदारी केली.