आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या अंकित बावणेची दुलीप करंडकासाठी निवड...!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादचा गुणवंत फलंदाज अंकित बावणेची दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघात निवड झाली आहे. गेल्या मोसमात रणजीत जबरदस्त कामगिरी केल्याचे फळ अंकितला मिळाले असून, दुलीप करंडकासाठी निवड झालेला तो औरंगाबादचा चौथा खेळाडू ठरला आहे.
सौराष्ट्रचा खेळाडू चेतेश्वर पुजाराकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. मात्र, याच वेळी मुंबई रणजी संघाचा कर्णधार वसीम जाफरला आश्चर्यकारकरीत्या संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र रणजी संघाकडून अंकित बावणेशिवाय कर्णधार रोहित मोटवाणी, हर्षद खडीवाले, अक्षय दरेकर आणि समद फल्लाह यांचीही पश्चिम विभागीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.
अंकित बावणे याने गेल्या रणजीच्या मोसमात महाराष्ट्राकडून दमदार कामगिरी करताना सर्वाधिक 531 धावा ठोकल्या. यात त्याची सरासरी 75.85 इतकी शानदार होती. या कामगिरीचे फळ त्याला मिळाले.

मिळालेल्या संधीचे सोने करीन

‘मला दुलिप करंडकात प्रथमच खेळण्याची संधी मिळणार आहे. विविध राज्यांच्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मला या स्पर्धेच्या निमित्ताने मिळेल. या खेळाडूंच्या अनुभवाने माझा खेळ अधिक प्रगल्भ आणि चांगला करण्यावर मी मेहनत घेईन.मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. चांगली कामगिरी करून आई-वडील, औरंगाबाद आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करीन.’
अंकित बावणे, रणजीपटू.

सत्रात अंकितची कामगिरी
07 सामने, 09 डाव,
531 धावा (महाराष्ट्राकडून सर्वाधिक), 75.85 सरासरी, 2 शतके, 2 अर्धशतके

चमकदार कामगिरी करावी
अंकित बावणेला दुलीप करंडकात संधी मिळाली, ही औरंगाबादसाठी अभिमनाची बाब आहे. त्याने संधीचे सोने करताना आता अधिक चमकदार कामगिरी करावी. औरंगाबाद जिल्हा क्रिकेटकडून त्याला मनपूर्वक शुभेच्छा.
सचिन मुळे, सचिव, एडीसीए.

पश्चिम विभागीय संघ :
चेतेश्वर पुजारा (कर्णधार, सौराष्ट्र), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार, मुंबई), हर्षद खडीवाले (महाराष्ट्र), सूर्यकुमार यादव (मुंबई), अभिषेक नायर (मुंबई), अंकित बावणे (महाराष्ट्र), अंबाती रायडू, रोहित मोटवाणी (महाराष्ट्र), अक्षय दरेकर (महाराष्ट्र), धवल कुलकर्णी (मुंबई), ईश्वर चौधरी (गुजरात), बलविंदरसिंग संधू ज्यु.(मुंबई), कमलेश मखवाना (सौराष्ट्र), समद फल्लाह (महाराष्ट्र).

औरंगाबादचा चौथा खेळाडू !
दुलीप करंडकात यापूर्वी औरंगाबादच्या तीन खेळाडूंनी खेळण्याचा मान मिळविला. इक्बाल सिद्दीकी, संजय बांगर आणि डावखुरा ऑलराऊंडर संदीप दहाड या तिघांनी दुलीप करंडकात प्रवेश नोंदविला. या तिघानंतर आता युवा फलंदाज अंकित बावणेला दुलीप करंडकात संधी मिळाली आहे.
संजय बांगर : 15 सामने, 650 धावापेक्षा अधिक धावा, 40 विकेट.
‘अंकितने मोठ्या खेळाडूंबरोबर स्वत:ची तुलना करून स्वत:चा दर्जा आणखी वाढवावा. अभिनव मुकुंद, सूर्या यांनी किती धावा काढल्या, हेही त्याने बघावे. मनापासून शुभेच्छा.’

इक्बाल सिद्दीकी : 16 सामने,
42 बळी, 8 वेळा सहभाग.
‘औरंगाबादच्या आणखी एका खेळाडूला संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. अंकितने आणखी मेहनत घेऊन मोठ्या संघाविरुद्ध धावा काढण्यावर जोर द्यावा. ऑल द बेस्ट.’

संदीप दहाड : 02 सामने, 2 बळी. (साऊथ झोन, श्रीसंतसोबत पर्दापण)
‘अंकित बावणेकडे टीम इंडियाचा कसोटी खेळाडू होण्याची क्षमता आहे. औरंगाबादने आणखी एका चांगला खेळाडू निर्माण केला आहे. अंकितने कामगिरीत सातत्य ठेवावे.’